पुणे : एकीकडे कसबा विधानसभा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत पराभवाचा मोठा झटका बसला तर दुसरीकडे चिंचवडमध्ये (Chinchwad Bypoll) भाजपाला आपला गड राखण्यात यश आले आहे. महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार विट्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यातील मतविभागणी झाल्याचा दावा केला जात आहे. तर भाजपचे शहराध्यक्ष-आमदार महेश लांडगे (MAhesh Landge) आणि विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी केलेल्या अचूक नियोजनानेच भाजपाचा (BJP) विजय सोपा झाला आहे., मात्र, मागील काही महिन्यांत झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधातील मतांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे.
अश्विनी जगताप यांनी १ लाख ३५ हजार ४३४ मते मिळवली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी ४४ हजार ८२ मते घेतली आहेत. एकूण ३६ हजार ९१ मतांधिक्याने ही निवडणूक भाजपाने जिंकली आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पदवीधर मतदार संघांतील निवडणुका तसेच पोटनिवडणुका याबाबत विश्लेषण करण्यात येत आहे. त्यात भाजपाविरोधात मतांचा टक्का वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कसबा पोटनिवडणुकीत ती प्रकर्षाने जाणवली आहे. चिंचवडमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळाली असती. मात्र, महेश लांडगे आणि शंकर जगताप या दोघांनी स्थानिक पातळीवर निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन केल्याने येथे भाजपला यश मिळाले आहे.
भाजपाने स्थानिक पातळीवर गावकी-भावकी आणि नाती-गोती जपत केलेले अचूक निवडणूक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरले. भाजपावर नाराज असलेला एक गट राहुल कलाटेंसाठी आणि दुसरा गट नाना काटेंसाठी अप्रत्यक्षपणे काम करीत होता. त्यामुळे सोसायटीधारक आणि भाजपा विरोधी मतांची विभागणी झाली.
MPSC Exam विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : ७५ हजार पदभरतीसाठी वयोमर्यादा वाढली!
२०१४ आणि २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे राहुल कलाटे यांच्या विधानसभा राजकीय कारकिर्दीचा उदय हा दिवंगत जगताप यांचा प्रखर विरोधक म्हणून झाला आहे. राहुल कलाटे निवडणुकीच्या रिंगणात नसते तर त्यांना मिळालेल्या ४४ हजार मतांपैकी बहुतांश मते ही भाजपाच्या उमेदवाराला मिळाली असती. त्यामुळे निवडणुकीचे गणित मांडताना राहुल कलाटे आणि नाना काटे यांच्या मतांची विभागणी झाली असे म्हणता येणार नाही, असे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.