प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून चांगलाच वाद रंगला. सभागृहात शिवसेना आणि भाजप आमदार संजय राऊत यांच्यावर तुटून पडले होते. संजय राऊतांच्या मुद्द्यावर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. त्याआधी सभागृहाचे कामकाज 3 वेळा तहकूब झाले होते.
सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर व्हरांडा, कॅंटिन किंवा पॅसेजमध्ये आमदारांचा गप्पांचा कट्टा सुरु झाला. गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळाच्या कॅंटिन, व्हरांडा असो वा पत्रकार कक्ष असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पोडीयम लावला तो परिसर असो याठिकाणी कसबा पोटनिवडणुकीचे काय होणार ? याचीच चर्चा रंगली होती. पत्रकार नेत्यांना भेटले तर तुम्हाला काय वाटतं कोण येईल ? असं विचारतात. तर नेते पत्रकारांना विचारतात तुमचा काय अंदाज ?
यामध्ये दोन नेते एकमेकांना भेटले तर पैज लावा कसबामध्ये आम्हीच येणार असं म्हणत आहेत. त्यामुळे जिकडे पाहा तिकडे कसब्याचीच चर्चा आहे. प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, राहुल कुल असो, नाना पाटोले, शिंदे गटाचे आमदार असो प्रत्येक जण आपल्या परिने आपण कसे प्रयत्न केले हे सांगताना दिसत होते.
Kasba byelection : ‘धंगेकरांना साडेसाती’; हेमंत रासने यांचे ग्रहमान अनुकूल
मुख्यमंत्र्यांनी यामध्ये कशी भूमिका बजावली ? हे शिवसेना आमदार ठासून सांगत आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी कसा किल्ला लढवला ? हे भाजप आमदार सांगताना दिसत होते. किमान 5 ते 10 हजाराने जिंकू असा भाजपाचा आत्मविश्वास आहे. तर ही जागा आम्हीच जिंकणार यवार काँग्रेसचे लोक ठाम आहे. या चर्चांमध्ये मात्र राष्ट्रवादीचे बरेचसे आमदार सावध भूमिका घेतानाही दिसत होते.