Download App

Gunaratna Sadaverte : खोड काही जाईना! सनद रद्द होऊनही सदावर्ते जैसे थेच

  • Written By: Last Updated:

बार काउन्सिल ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी देण्यात आले होते. त्यानंतर आता या प्रकरणी डॉ. गुणरत्न सदावर्ते यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांना निलंबनाविरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहे.

तिथं न्याय न मिळाल्यास पुन्हा हायकोर्टात दाद मागण्याची मुभा कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन वर्षांसाठी वकिलीची सनद रद्द झाल्यानंतरही सदावर्ते दाम्पत्याच्या हरकती आहे तशाच असल्याचे दिसून येत आहे. कारण आजच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्याकडून सदावर्ते दाम्पत्याला कोर्टरूममधील शिस्त पाळण्याबाबत वारंवार समज देण्यात येत होती.

का रद्द करण्यात आली सदावर्तेंची सनद?
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात कर्मचाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का बसला आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्ररकणी पुण्यातील वकील सुशील मंचरकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावर मध्यंतरी सुनावणी पार पडली. त्यानंतर सदावर्तेंची सनद रद्द करण्याचा निकाल देण्यात आला होता.

बार काउन्सिलने वकिलांसाठी काही नियम ठरवून दिलेले आहेत. ज्यामध्ये वकिलांनी कसे वागावे आणि काय काय करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.  यातील निमय 7 मध्ये वकिलांनी सार्वजनिक ठिकाणी कोट आणि बँड घालण्यास मनाई करण्यात आली आहे. या दोन्ही गोष्टी न्यायालयीन परिसरात किंवा न्यायालयीन कार्यक्रमातच वापरण्यास परवानगी आहे.  मात्र, सदावर्तेंनी आझाद मैदानासह अनेक बैठकांमध्ये हजेरी लावली होती. एवढेच नव्हे तर, सदावर्तेंनी कोट आणि बँड घालून नाच केला होता. सदावर्तेंचे हे वर्तन एकप्रकारे वकिली नियमांचे उल्लंघन आणि अपमान करणारे होते. याच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपण सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल केली. त्यावर सुनावणी पार पडली. त्यात बार काउन्सीलने वकिलांसाठी ठरवून दिलेल्या नियामाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदावर्तेंची वकीली सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारीत नेमकं काय? 

अॅड. मंचरकर यांनी या नियमांच्या उल्लंघनप्रकरणी बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार दाखल केली होती. यात त्यांनी सदावर्तेंनी वकिलांसाठी बनवण्यात आलेल्या सेवा नियमांचा भंग केल्याचे नमुद करण्यात आले होते. वकिलांसाठी असणार कोट आणि बँड न्यायालयाबाहेर सार्वजनिक ठिकाणी परिधान करणे, तो घालून नाचणे आदी सदावर्तेंनी केल्याचे या तक्रारीत नमुद करण्यात आले होते. वकिलांनी केवळ न्यायालयात काळा गाऊन घालावा, असा नियम आहे. त्यामुळे सदावर्ते यांनी वारंवार माध्यमांसमोर अशा प्रकारे व्यावसायिक गैरवर्तन केले आहे, असा दावा या तक्रारीत करण्यात आला होता. अखेर त्यावर आज सुनावणी पार पडल. ज्यात वकिलांसाठी बनविण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार काउन्सिल ऑफ इंडियाने सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags

follow us