बिबट्याबरोबर लांडगे पण आले, एखादा नासका आंबा असतो, अजित पवारांचा लांडगेंवर वार

जकात नाक्यावर याचे काय उद्योग चालायचे? 40 हजार कोटी खर्च झाले, पण त्यातून कुणी जमिनी घेतल्या, प्रॉपर्टी खरेदी केली याची माहिती आहे

News Photo   2026 01 13T171459.658

बिबट्या बरोबर लांडगे पण आले, एखादा नासका आंबा असतो, अजित पवारांचा लांडगेंवर वार

राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे आणि पिंपरी महापालिकेच्या (Pune) निवडणुकीत अजित पवार विरुद्ध भाजप असा वाद चांगलाच पेटल्याचं दिसतंय. अजित पवार आणि पिंपरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता भोसरीतील सभेतली अजित पवारांनी महेश लांडगे यांच्यावर जहरी टीका केली.

जकात नाक्यावर याचे काय उद्योग चालायचे? 40 हजार कोटी खर्च झाले, पण त्यातून कुणी जमिनी घेतल्या, प्रॉपर्टी खरेदी केली याची माहिती आहे असं अजित पवार म्हणाले. भारंदाज डाव टाकून यांना फिरवून फिरवून फेकून नाही दिला तर पवारांची औलाद सांगणार नाही असं आव्हानही त्यांनी दिलं. महेश लांडगे नासका आंबा असल्याची टीका अजित पवारांनी केली. ते म्हणाले की, बिबट्या बरोबर आता लांडगे पण आलेत. सगळे लांडगे एका माळीचे मणी नाहीत. एखादा आंबा नासका असतो. पण तो वेळीच काढला नाही तर तो अख्खी आळी नासवतो. पुण्यातला भ्रष्टाचार वाढलाय, पुणे शहराचं झालेलं वाटोळं पाहून मला फार चीड येते असं अजित पवार म्हणाले.

VIDEO : उंटावरून शेळ्या हाकू नको; आमदार महेश लांडगेंचे अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर

महेश लांडगे यांच्यावर आरोप करताना अजित पवार म्हणाले की, काय होतास तू, काय झालास तू? जकात नाक्यावर काय उद्योग चालायचे? या भ्रष्टाचाराच्या राक्षसाला संपवा, अन्यथा भोसरीचं भविष्य अंधारात आहे. यांना भंगाराची उपमा देऊ की आणखी कशाची? महेश लांडगे यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, भारंदाज डाव घालून फिरवून फिरवून फेकून नाही दिला तर पवारांची औलाद सांगणार नाही. फक्त यांनाच डाव माहीत आहेत का? मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष राहिलोय. मला घुटना चित कसं करायचं हे मला पण माहीत आहे.

पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या नावाखाली खर्च केलेले 40 हजार कोटी कुठं गेले? कुठं पाणी मुरलं? कुणाची प्रॉपर्टी वाढली? राजगुरूनगर तालुक्यात कोणी जमिनी घेतल्या? नातेवाईकांच्या नावाने कुठं-कुठं प्रॉपर्टी घेतली याची सगळी माहिती असल्याचं अजित पवार म्हणाले. महेश लांडगे यांचं नाव न घेता अजित पवार यांनी टीका केली. ते म्हणाले की, यांचं अख्ख घर या कामात आहे. इथं यूपी-बिहार सारखी परिस्थिती झाली आहे. स्वतःच्या प्लॉट मध्ये घर बांधायचं म्हटलं की आकाच्या धमक्या येतात. हे लोक खंडण्या जमा करतात. आता ही सत्ता जायलाच हवी. अन्यथा पुन्हा तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही असा इशारा अजित पवारांनी मतदारांना दिला.

अजित पवारांनी केलेल्या मोफत मेट्रोच्या घोषणेवर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मेट्रोमध्ये मोफत प्रवास देणार, हे मी सांगितलं. तर कुणीतरी म्हणलं याला कॅबिनेटची मान्यता लागते. अरे बाबा, यासाठी कॅबिनेटच्या मान्यतेची याला गरज नाही, मी जे मोफत देतोय त्याचा मी अभ्यास केला आहे असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. अजित पवारांनी यावेळी भाजपच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “75 वर्षांवरील ज्येष्ठांना पीएमपीएल आणि मेट्रो मोफत करणार म्हणाले. अरे 75 वयाचे किती ज्येष्ठ प्रवास करतात हे सांगा बरं. आता काय 75 वय होईपर्यंत झुरुन-झुरुन वाट बघायची का?”

Exit mobile version