Download App

अजितदादांनी उपटले काँग्रेस नेत्यांचे कान; म्हणाले, गुडघ्याला बाशिंग बांधण्याची गरज नाही..

Ajit Pawar News : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होणार का अशा चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने वेगळी भूमिका घेत निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. आज गिरीश बापट आपल्यातून जाऊन फक्त तीन दिवस झाले आहे. असे असताना आपल्या काही परंपरा आहेत की नाही? जनाची नाही तर मनाची तरी नाही का ? लोक तर असेच म्हणतील अशा शब्दांत पवार यांनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले आहेत.

बापटांच्या जागी कोण? सूनबाईंपासून मोहोळ, मुळीक यांसह अनेक नावे चर्चेत

काय म्हणाले वडेट्टीवार ? 

पुण्यातील  पोटनिवडणुकीबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले होते, की ‘आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही.’ पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं. प्रत्येकवेळी भाजप लढली आहे. त्यामुळे आम्हीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक (Pune Lok Sabha) लढणार आहोत. ज्या ज्या निवडणुका येतील, त्या त्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे.’

संजय राऊत म्हणत होते ते हेच दंगे का ? ; सोमय्यांकडून राऊत टार्गेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर अजित पवार म्हणाले, मला राष्ट्रपती राजवट लागेल असं वाटतं नाही. माझी जयंत पाटील यांच्याशी भेट होईल. त्यावेळी त्यांना विचारेल की याबाबत तुम्हाला काय माहिती मिळाली.

गौरव यात्रा काढा पण, महागाईकडे लक्ष द्या 

राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वक्तव्य केले आणि त्यातून हा मुद्दा आला आहे. त्यानंतर आम्ही चर्चा केली. आमचं मत आहे की राष्ट्रीय महापुरुषांबद्दल आदर केला पाहिजे. समाजात वातावरण दूषित होऊ नये. गौरव यात्रा काढणे हा तुमचा अधिकार आहे पण, महागाई आणि बेरोजगारीकडे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा असावी असे वाटते.

 

Tags

follow us