Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजलयं. काल भाजपकडून उमेदवारांची पहिली यादीही जाही झालीये. मात्र, महाविकास आघाडीमधली जागावाटपाची चर्चा कीही अंतिम झालेली नाही. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात मोठा तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती सध्या आहे. ‘नाना पटोले बैठकीला आले तर आम्ही चर्चा करणार नाही’ अशी टोकाची भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतल्याचंही वृत्त आहे. त्यामुळे हा वाद नक्की कुठल्या जागेवरून इतक्या टोकाला गेला हा प्रश्न निर्माण होत आहे.
Congress First list : मोठी बातमी! काँग्रेसच्या 54 उमेदवारांची यादी निश्चित; महत्त्वाची नावं आली समोर
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून साजिद खान पठाण यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. परंतु, साजिद खान पठाण यांच्या नावाला प्रचंड विरोध आहे. स्वपक्षातील म्हणजे काँग्रेसमधीलही अनेक नेत्यांचा खान यांना विरोध असल्याचं बोललं जातय. लोकसभा निवडणुकीच्या काळात अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मात्र, काँग्रेसमधील काही नेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत, या पोटनिवडणुकीला ब्रेक लावला होता. हे सगळ चित्र पाहता या नावावर शिक्कामोर्तब होणं कठीण मानलं जातय.
हे सगळ असतानाही काँग्रेसचे प्रदेश पातळीवरील नेते काही झालं तरी साजिद यांनाच उमेदवारी देणार यावर ठाम आहेत. त्यामुळं कितीही विरोध झाला तरी साजिद यांनाच उमेदवारी मिळेल असं बोललं जातय. त्याचबरोबर साजिद खान पठाण यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आक्रमक होऊ शकते, असंही बोललं जातय. अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या जागेसाठी काँग्रेस विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रचंड आग्रही आहेत.
जागा वाटपावरून फिसकटले तर काँग्रेसचा प्लॅन बी सर्वच मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागविले !
महाविकास आघाडीमध्ये काही जागांच्या वाटपावरून तणावाची स्थिती आहे. हा वाद वाढलेला आहे. तो इतका वाढलेला आहे की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून निघून जाणार होते. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पटोले यांना अक्षरशः हात धरून खाली बसवलं होतं.
शिवसेनेकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार करण्यात आली आहे. पटोले हे जागा वाटपात अडवणुकीची भूमिका घेत आहेत, अशी ही तक्रार आहे. त्यामुळे पटोले असतील तर चर्चा करणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. अशात जोपर्यंत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीमधील चर्चा पुढं सरकणार नाही, अशी भूमिका शिवसेनेकडून घेतली असल्याचं बोललं जातय.
विदर्भातही काही जागांवरून वाद
विदर्भात काँग्रेस पक्षाची ताकद जास्त आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष जास्त जागा लढण्यावर आग्रही आहे. विदर्भात काँग्रेस पक्षाकडून उद्धव ठाकरे यांना 8 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेना पक्षाने विदर्भात 12 जागांवर दावा केला आहे. या 12 जागांवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांचा एकही आमदार नाही यामुळे या जागा आम्हाला द्याव्यात, असं शिवसेना ठाकरे गटाचं मत आहे. यामुळे महाविकास आघाडीत सध्या संघर्ष सुरू आहे.