Maharashtra Politics : केंद्रीय नेतृत्वाचा आदेश मान्य करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं. त्यानंतर मुख्यमंक्षी पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. आता शिंदे-फडणवीस सरकार येऊन नऊ महिने उलटल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी मनातलं सांगून टाकत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट केले आणि स्वतःच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. यानंतर आता फडणवीस यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकू लागले आहेत. फडणवीस यांचे होम ग्राउंड नागपुरमध्येच असा प्रकार घडल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशा आशयाचे बॅनर नागपुरातील बुटीबोर नगरपरिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी लावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात काही भूकंप होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
या प्रकारावर फडणवीस यांनीही भाष्य केले आहे. ते म्हणाले, नागपुरमध्ये भावी मु्ख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. ज्यांनी कोणी ते लावले आहेत त्यांनी ते काढून टाकावेत. काही अतिउत्साही लोक असतात, ते असं करतात. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि 2024 मध्ये तेच मुख्यमंत्री असतील. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.