Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही. अजित पवारच आमच्या पक्षाचे नेते आहेत अशी भूमिका काल जाहीर केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादीत कोणतीच फूट पडली नसल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला. फूट पडणे याचा अर्थ काय, पक्षात फूट कधी होते याचा अर्थ सांगत शरद पवार यांनी हे वक्तव्य केले.
शरद पवार (Sharad Pawar) यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. यासाठी कोल्हापुरला रवाना होण्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकेल असे सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही हे सुद्धा स्पष्ट केले. अजित पवार हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
त्यानंतर शरद पवार म्हणाले, आहेतच, त्यात काहीच वाद नाही. फूट पडणे याचा अर्थ पक्षात फूट कधी होते? जर पक्षातच एक मोठा वर्ग देशपातळीवर वेगळा झाला तर. पण, आज येथे तशी स्थिती नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली त्यामुळे पक्षात फूट पडली असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. त्यांचा निर्णय त्यांनी घेतला, आहे असे पवार यांनी स्पष्ट केले.
Sharad Pawar : 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचाच ‘आवाज’; पवारांनीही केलं मोठं भाकित
बीड येथे जाहीर सभा झाल्यानंतर आता अजित पवार गटाची सभा होत असल्याचा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावरही पवार यांनी भाष्य केले. लोकशाहीत कुणालाही सभा घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याची चिंता करण्याची गरज नाही. उलट आनंदच आहे. उलट ते सुद्धा त्यांची भूमिका मांडण्यासाठी पुढे येत आहेत. जनतेला यातून सत्य काय आहे ते नक्कीच कळेल. त्यामुळे कुणीही सभा घेऊन त्यांची भूमिका मांडत असेल तर त्याचं स्वागतच आहे, असे पवार म्हणाले.
आमचा पक्ष एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सत्तेत आहे, तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहात आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक झाली. ही गुप्त भेट असल्याचे बोललं गेलं. त्यावर आम्ही गुप्त बैठक करत नाही. चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक का होईल? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.