Download App

बाळासाहेब थोरात-नाना पटोले एकाच व्यासपीठावर; चहाच्या पेल्यातील वादळ शमलं ?

मुंबई – नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर आ. बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीनाट्याची राज्यभरात चर्चा झाली. त्यांनी काँग्रेस (Congress) विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. ‘विधानपरिषद निवडणुकीत खूप राजकारण झालं. ते मला व्यथित करणारं आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविल्या आहेत,’ असेही थोरात म्हणाले होते. त्यानंतर पटोले आणि थोरात वादाची चर्चा रंगली होती. मात्र, दोघांनीही त्याचा  इन्कार केला होता. या सगळ्या घडामोडींनंतर थोरात आणि पटोले भारत जोडो यात्रींच्या सत्काराच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसले. या दोघांच्याही हस्ते भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.त्यामुळे चहाच्या पेल्यातील वादळ शमलं, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

बाळासाहेब आम्हाला सोडू नका – पटोले

यावेळी नाना पटोले म्हणाले, की ‘देशाची प्रतिमा मलीन करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. देश विकून चालविणारी लोकं छाती ठोकून सांगत आहेत की देशातील नागरिक आमच्याबरोबर आहेत, हे दुर्दैव आहे. मध्यंतरीच्या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे हा संभ्रम दूर करण्यासाठी कार्यकारिणी बोलावली आहे. काही नेते बैठकीला उपस्थित राहत नाहीत. दिलेली जबाबदारीही पार पाडत नाहीत. ही पदे शोभेची नाहीत. कार्यकर्ते खूप आहेत. त्यांना संधी दिली नाही. तुम्हाला दिलेल्या संधीचे सोने करा. कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका,’ असे पटोले म्हणाले. पटोले पुढे म्हणाले, की ‘बाळासाहेब तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही आमचा हात सोडला आणि तुम्हाला दुखापत झाली.आम्ही जर तुमच्याबरोबर असतो तर तुम्हाला दुखापत झाली नसती.’

आता हात जोडतोय – थोरात

थोरात म्हणाले, की भाजप सरकार दिशाभूल करत आहे. थोरात यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे कौतुक केले. संपूर्ण देशभरात फक्त महाराष्ट्रातच यात्रेचे नियोजन चांगले झाले. यात्रा यशस्वी करण्यासाठी हजारो लोकांनी परिश्रम घेतले. त्यामुळे काश्मीरला यात्रा पोहोचण्यापर्यंत महाराष्ट्रातील यात्रेचे कौतुक होत होते. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. लोकशाही राहणार की नाही. राज्यघटनेचे काय होणार हे प्रश्न आज आहेत. मग यातून वाचविणार कोण तर फक्त काँग्रेसच वाचविणार आहे. कारण,  काँग्रेसचा विचार सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे. एकमेकांच्या संवादातून निर्णय घेतले जाणे गरजेचे आहे, असे थोरात म्हणाले.

काँग्रेसचे आता हाथ से हाथ जोडो अभियान सुरू होत आहे.  यासाठी तयारी करत आहोत. त्यातच माझा हात तुटला आता हा हातच जोडण्याचे काम सध्या सुरू आहे,  असे थोरात यांनी म्हणताच सभागृहात जोरदार हशा पिकला.

Tags

follow us