अहमदनगर : अंधश्रद्धेला थारा न देता प्रत्येकानं शुद्ध आचार व शुद्ध आहार ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. देवपण येण्यासाठी मोठं कष्ट सोसावं लागत असून आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat)हे सर्वमान्य नेतृत्व आहे. तालुका व जिल्ह्यासाठी हा आपला माणूस आपला स्वाभिमान असल्याचं प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Maharaj Indurikar)यांनी केलंय.
वेल्हाळे येथे हरी बाबा मित्र मंडळाच्यावतीनं आयोजित आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सप्ताहाच्या सांगताप्रसंगी कारल्याच्या किर्तनात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, रणजीत सिंह देशमुख, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, अजय फटांगरे, आयोजक तानाजी शिरतार, रमेश जेडगुले, व्यंकटेश महाराज सोनवणे, वैजयंती शिरतार, जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
यावेळी इंदुरीकर महाराज म्हणाले की, अपघात टाळण्यासाठी व्यसन करू नये, त्याचबरोबर वेगाची मर्यादा राखावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलवर बोलणंही टाळलं पाहिजे. यावेळी चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या विविध बाबी लक्षात आणून देत चांगल्या सवयी, चांगली संस्कृती, चांगला आहार यावर उपस्थितांना प्रबोधन केलं.
सात दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी वेल्हाळे, मालदाड, घुलेवाडी यांसह परिसरातील भाविक दररोज मोठ्या संख्येने उपस्थित होते.