मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्यासह काही जणांनी या जागेवरुन माझ्याविरोधात म्हाडाकडे तक्रार केली. म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून वांद्रे येथील कार्यालय तोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला. सोमय्यांनी कार्यालय तोडण्यासाठी बिल्डरांना सुपारी देण्यात आल्याचा दावा अनिल परबांनी (Anil Parab) केला.
तसेच कार्यालयाचं पाडकाम पाहायला वांद्रे इथे येणाऱ्या किरीट सोमय्या अनिल परब यांनी आव्हान दिलं. त्यांना इथे यायचं असेल, तर पोलिसांनी त्यांना अडवू नये. त्यांनी इथे यावं, आम्ही स्वागत करायला तयार आहोत. त्यांनी शिवसैनिकांचा आणखी पाहुणचार अनुभवला नाही,” असं अनिल परब यांनी सुनावले. तर किरीट सोमय्यांना पोलिसांनी बीकेसीमध्येच रोखलं. संभाव्य वादाची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारी म्हणून किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्या निवासस्थानी जाण्यापासून अडवलं.
भाजपला ही भूमिका मान्य आहे का ? किरीट सोमय्या कोण आहे ? म्हाडाचा अधिकारी आहे का ? असे सवाल अनिल परब यांनी विचारले. माझ्यासारख्या ५६ जणांवर कारवाई झाली तर त्याची जबाबदारी किरीट सोमय्यांची असणार आहे. मी किरीट सोमय्यांना आव्हान देतो की, आम्ही स्वागत करायला तयार आहोत. त्यांनी शिवसैनिकांचं स्वागत अनुभवावं. गरिबांच्या घरावर वरवंटा फिरवला जाणार असेल तर सोक्षमोक्ष हा लागला पाहिजे.
मी किरीट सोमय्यांना मोजत नाही. माझ्याबरोबर सर्व ५६ वसाहतीमधील लोक आहेत. गरीबांच्या पोटावर जर किरीट सोमय्या येणार असतील तर मी सामोरं जाणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर देखील हा विषय मांडणार आहे. मी पोलिसांना सांगितलं आहे की, किरीट सोमय्या इकडे येऊ द्या, आम्ही स्वागत करु. माझ्यावर हल्ला म्हणजे उद्धव ठाकरेंवर हल्ला असं त्यांना वाटतं आहे. आता आम्ही रस्त्यावर आलो आहे, यामुळे आता उत्तर देणार आहे, असं अनिल परब म्हणाले.