भाजपत मुनगंटीवार एकनाथ खडसेंची पुनरावृत्ती करणार की देवेंद्रंना शह देणार? राजकीय वर्तुळात खळबळ…

मुनगंटीवीर यांचे वक्तव्य पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात खूप काही बिघडल्याचे चित्र आहे.

Thumb 17

Thumb 17

Will Sudhir Mungantiwar become another Eknath Khadse in BJP?: राज्यातील २८८ नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या वक्तव्यांनी माध्यमांचे विशेष लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते राज्यात जरी भाजपच क्रमांक १ चा पक्ष ठरला असला तरी काही ठिकाणी भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने, जसे की त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला अपयश आलं. भाजपचा विजयरथ रोखण्यात काँग्रेसला तिथं यश आलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या  मूल आणि बल्लारपूर या दोन नगरपरिषदांमध्येही भाजपचा पराभव झाला. त्यानंतर मुनगंटीवारांनी पक्ष नेतृत्वावर टीका केली. त्यामुळे आता त्यांची गत ही एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांच्यासारखी होते की काय, अशी शंका यायला लागली आहे.

नगरपरिषद निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे, उमेदवारांची निवड आणि आघाडी-युतीतील गोंधळ याचा परिणाम थेट निकालांवर दिसून आला. अनेक ठिकाणी भाजपचे बंडखोर उमेदवार, तर काही ठिकाणी स्थानिक नेत्यांमधील मतभेद पक्षाला अडचणीत आणणारे ठरले. या निकालांनंतर मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दांत आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे संकेत दिले. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जिंकल्या जातात. संघटन मजबूत नसेल तर फक्त मोठ्या नेत्यांची नावे पुरेशी ठरत नाहीत,” असे सूचक विधान त्यांनी केले.

Pune Election : पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का…पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले भाजपात डेरेदाखल…

चंद्रपुरातील पराभवानंतर मुनगंटीवारांनी  विरोधकांऐवजी भाजप नेतृत्वाच्या विरोधात मत व्यक्त केलं. चंद्रपूर, मूल आणि बल्लारपूरच्या पराभवाचं कारण स्पष्ट करताना मुनगंटीवारांनी पक्षावर त्यांची ताकद काढून घेतल्याचा आरोप केला. उघडपणे मंत्रीपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्याची संधी त्यांनी सोडली नाही.  सातव्यांदा विधानसभेवर निवडून आल्यानंतरही आपल्याला मंत्रिपद न दिल्याचं मुनगंटीवार यांनी बोलून दाखवलं. दुसऱ्या माध्यमांशी बोलताना पुन्हा त्यांनी त्यांची नाराजी वेगळ्या शब्दांत बोलून दाखवली. चंद्रपूरात मुनगंटीवारांना आम्ही ताकद देणार,  असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंही होतं. त्यावर पुन्हा पलटवार  करताना, ‘ मला ताकदीची गरज नाही, मी ताकद नसतानाही काम करतो’ असं सांगितलं होतं. भाजप नेतृत्वाला इशारा देत पक्षातील नाराजांना एकत्र करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. आपण राज्याचा दौैरा करणार असल्याचं ते म्हणाले. 

‘भाजपत गटबाजीला पोषक असं वातावरण तयार होऊ नये याची नेतृत्वानं काळजी घेतली पाहिजे. तुम्ही पक्षात अशा लोकांना प्रवेश देता की ज्यांनी सर संघचालकांचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून फक्त सत्तेसाठी आपण पक्षाचा झेंडा उचललेला नाही तर विचारांसाठी उचलला आहे,’ असही ते म्हणाले.

 

राहुल गांधींच्या डोकेदुखीत भर घालणारे नवीन वर्ष! 2026 मध्ये सोडवाव्या लागणार 11 समस्या

 

मुनगंटीवीर यांचे वक्तव्य पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात खूप काही बिघडल्याचे चित्र आहे. अशाच प्रकरचे वक्तव्य याआधी एकनाथ खडसे यांनी केले होते. तेव्हा ते पक्षात एकटे पडले होते, काही काळानंतर त्यांना पक्षही सोडावा लागला होता. आता पक्षात ही वेळ सुधीर मुनगंटीवारांवर येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे.

Exit mobile version