Download App

कर्नाटक गमावलं, तेलंगणाने नाकारलं; ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम अजूनही भाजपच्या टप्प्याबाहेरच

हैदराबाद : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कमळ फुलले असले तरीही तेलंगणामध्ये (Telangana Election Result) काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. 119 पैकी काँग्रेसने आतापर्यंत 63 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची मोटार अवघ्या 41 जागांवर थांबल्याचे चित्र आहे. भाजपला तर अवघ्या आठ जागांवरच आघाडी मिळविता आलेली आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपसाठी हे आकडे म्हणजे मोठा धक्का मानला जात आहे. तर काँग्रेसला एक नवीन राज्य मिळाल्याची गुडन्यूज मिळाली आहे. (BJP, Karnataka, Telangana, Andhra Pradesh, Kerala, Tamilnadu)

दरम्यान, या निवडणुकीनंतर भाजपला अजूनही दक्षिण भारताचे दार बंदच असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत यश मिळाले होते. त्यानंतर तेलंगणा जिंकण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार यांनी तेलंगणात भाजपसाठी प्रचार मोहीम राबविली होती. मात्र या मोहिमेला यश आलेले नाही. तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीली धूळ चारत काँग्रेसने बाजी मारली आहे.

KCR यांचे काय चुकले? राष्ट्रीय राजकारणात जात असतानाच स्वतःच्याच राज्याकडे केलेले दुर्लक्ष!

भाजप मागील जवळपास 4 दशकांपासून दक्षिणेतील राज्यांमध्ये पक्षविस्तार आणि संघटनेच्या मजबुतीसाठी काम करत आहे. मात्र कर्नाटक वगळता भाजपला अद्याप केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये एकदाही यश मिळालेले नाही. या राज्यांमधील राजकारणावर तिथल्या प्रादेशिक पक्षांची मजबूत पकड आहे. तामिळनाडूमध्ये 1967 पासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक आलटून पालटून सत्तेत येत आहेत. तर केरळमध्ये मागील अनेक दशकांपासून काँग्रेस आणि डाव्यांचे प्राबल्य आहे.आंध्रप्रदेशमध्ये तेलगु देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांची पकड आहे. यातील वायएसआर काँग्रेस सध्या सत्ताधारी पक्ष आहे.

Election Results 2023 : 2018 मधील चूक टाळली, मोदी फॅक्टर चालला; 3 राज्यांत भाजप सुस्साट!

भाजपची उत्तरेवर मजबूत पकड :

भाजपची लोकसभा निवडणुकांसाठी सर्व मदार ही काऊ बेल्ट अर्थात उत्तर भारतावरच राहिलेली आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला उत्तर भारतातील कामगिरीच्या आधारेच लोकसभेत बहुमताचा आकडा गाठता आला होता. त्यामुळे भाजपने दक्षिण भारतावर लक्ष केंद्रीत केले होते. मात्र अद्याप देखील भाजपला इथे पाय रोवून उभे राहता आलेले नाही.

Tags

follow us