हैदराबाद : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कमळ फुलले असले तरीही तेलंगणामध्ये (Telangana Election Result) काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. 119 पैकी काँग्रेसने आतापर्यंत 63 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची मोटार अवघ्या 41 जागांवर थांबल्याचे चित्र आहे. भाजपला तर अवघ्या आठ जागांवरच आघाडी मिळविता आलेली आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी हे आकडे म्हणजे मोठा धक्का मानला जात आहे. तर काँग्रेसला एक नवीन राज्य मिळाल्याची गुडन्यूज मिळाली आहे. (What will happen to KCR’s party expansion strategy after Bharat Rashtra Samithi’s defeat in Telangana)
दरम्यान, आता या निकालांनंतर भारत राष्ट्र समितीच्या पक्षविस्तार धोरणाचे काय होणार? असा सवाल विचारला जात आहे. मागील काही दिवसांपासून के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात बीआरएसने तेलंगणाबाहेर पक्षविस्ताराचे धोरण अवलंबिले होते. राष्ट्रीय राजकारणाची तयारी करण्यासाठी त्यांनी गतवर्षी ऑक्टोबरमध्ये पक्षाचे नाव TRS (तेलंगणा राष्ट्र समिती) बदलून BRS (भारत राष्ट्र समिती) केले. यानंतर त्यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले होते. तेलंगणाच्या निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी दिवस बाकी असताना आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राज्यात त्यांच्या विरोधात वातावरण तयार केले जात असतानाच ते महाराष्ट्रात दाखल झाले.
महाराष्ट्रात केसीआर यांनी शक्तीप्रदर्शन करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांनी नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर इथे भव्य सभा घेतल्या. येताना ते शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन येत. सोलापूमधील सभेसाठी तर त्यांनी तेलंगणाचे संपूर्ण मंत्रिमंडळ त्यांच्यासोबत आणले होते. महाराष्ट्रात पक्षविस्तार करण्यासाठी त्यांनी विविध नेत्यांना, माजी आमदारांना, खासदारांना भारत राष्ट्र समिती घेतले. केवळ पक्षात घेतले नाही, तर त्यांना ताकदही दिली. हैदराबादला येण्यासाठी हेलिकॉप्टरची सोय, राहण्याची बडदास्त, मोठ्या प्रमाणात निधी दिला.
केसीआर यांनी आतापर्यंत तीन माजी खासदार आणि 15 माजी आमदार महोदयांना केसीआर यांनी पक्षाच्या गोटात दाखल करुन घेतले आहे. यात उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी, यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसाम, ठाणे जिल्ह्यातील माजी आमदार दिगंबर भिसे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार शंकर धोंडगे, माजी आमदार नागनाथ घिसेवाड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार दीपक आत्राम, सोलापूर जिल्ह्यातील बडे नेते भगीरथ भालके, अहमदनगरमधील बडे नेते घनश्याम शेलार यांचा समावेश आहे. पण आता तेलंगणामध्येच केसीआर यांचा पराभव झाल्यामुळे या सर्व नेत्यांचे काय होणार असा सवाल विचारला जात आहे.
आतापर्यंत पक्षाने सर्वच विधानसभा मतदार संघात समन्वयक नेमले आहेत. या समन्वयकांना टॅब आणि अन्य साधन सामग्री पुरवण्यात आली आहे. याशिवाय राज्यात सुमारे 20 लाख 85 हजार पदसिद्ध पदाधिकाऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शिवाय 17 हजार गावांमध्ये पदाधिकारी नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता दोन महिन्यांत तब्बल दोन कोटींहून अधिक जणांची सदस्य नोंदणी करण्याचे उद्दीष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता राज्यात विभागनिहाय कार्यालय स्थापन करून पक्ष विस्ताराचे काम केले जाणार आहे. सोबतच आपल्या पदाधिकाऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 ते 5 लाख रुपयांचा निधी वर्ग केल्याचेही सांगितले जात आहे.