Maharashtra Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत तणातणी झाल्यानंतर अखेर जागावाटप झालं आहे. सध्या जागावाटपासाठी ८५-८५-८५ असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. या फॉर्म्युल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट खुश होतील खरे पण काँग्रेससाठी ही (Congress Party) परिस्थिती फार सुखावह नाही. त्यामुळेच हा फॉर्म्युला अंतिम नाही. काँग्रेस किमान १०० जागांवर लढणार असा सूर पक्षाच्या नेत्यांकडून आळवला जात आहे. सद्यस्थितीतील घडामोडीत काँग्रेस राज्यातील २८८ पैकी फक्त ८५ जागा लढणार असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट दोघेही इतक्याच जागांवर उमेदवार देणार आहेत. काँग्रेससाठी चिंतेची बाब म्हणजे पक्ष पहिल्यांदाच इतक्या कमी जागांवर लढत आहे.
मागील १५ वर्षांतील काँग्रेसची कामगिरी पाहिली तर यंदा काँग्रेस पक्ष इतक्याच जागांवर लढू शकत होता. पण राज्यात मोठा भाऊ होण्याचे जे स्वप्न काँग्रेस नेते पाहत होते ते आता काही पूर्ण होणार नाही. जर या निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी झाली तरी सत्तेतील हिस्सेदारी घेताना काँग्रेसला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हातातून निसटण्याची शक्यता जास्त राहील. तसेही २०२० मध्ये उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) याचा अनुभव काँग्रेसला दिला आहेच. यावेळी काँग्रेसचा मुख्यमंत्री होता होता राहिला होता.
आजमितीस काँग्रेसचा राज्यातील जनाधार कमी होत चालला आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होत (Maharashtra Elections) नाही ही काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणारी बाब आहे. हरियाणा याचे उदाहरण आहे. येथे जिंकत असलेला सामना काँग्रेसने गमावला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने चांगले प्रदर्शन केले. एकूण १३ जागा जिंकल्या. यातील ११ जागांवर भाजप उमेदवारांचा पराभव केला.
सहाव्यांदा आमदारकीचा आशीर्वाद मिळणारचं; अर्ज भरण्यापूर्वी फडणवीसांचा जोरदार ‘शंखनाद’
भाजपाला पराभूत करायचे असेल तर काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला. पण एक गोष्ट ही सुद्धा खरी आहे की २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात फक्त १ जागा मिळाली होती. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त ४४ आमदार निवडून आले होते. अशा परिस्थितीत जर काँग्रेसला महाराष्ट्रात मजबूत व्हायचे असेल तर पारंपरिक व्होट बँक मजबूत करावी लागणार आहे. यासाठी पक्षाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.
काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत फक्त ८५ जागांवर लढत आहे. याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येते की राज्यातील इतक्याच मतदारसंघांत काँग्रेसची स्थिती चांगली आहे. राज्याच्या राजकीय गणिताचा विचार केला तर मराठवाडा आणि विदर्भात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होत असते. या भागांतून राज्यातील जवळपास १०० जागा निघतात. जाणकारांच्या मते या कारणामुळे यंदा काँग्रेसला फक्त ८५ जागांवर लढण्यास सांगण्यात आले असेल. याचा अर्थ असा की पक्षाला बालेकिल्ल्यात आणखी परिश्रम घ्यावे लागणार आहेत. तरच महाविकास आघाडीत काँग्रेसचे म्हणणे ऐकून घेतले जाईल.
महाराष्ट्रात काँग्रेस कोणा एकाच स्थानिक नेत्यावर अवलंबून नाही ही जमेची बाजू म्हणावी लागेल. राजस्थानात जसा सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात वाद होता, हरियाणात भूपेंद्र सिंह हुड्डा आणि कुमारी शैलजा यांच्यात वाद होता अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. उलट येथे तर वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक नेते काम करत आहेत. त्यामुळे महत्त्वाकांक्षा आणि सत्तेसाठी रस्सीखेच येथील काँग्रेस नेत्यांत दिसून येत नाही. लातुरात अमित देशमुख, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार, भंडाऱ्यात नाना पटोले आपापली उपस्थिती दर्शवितात. या नेत्यांच्या बळावरच काँग्रेस पुढे जात आहे.
इंडिया आघाडीत (INDIA Alliance) असल्यामुळे अन्य पक्षांप्रमाणे काँग्रेसला सुद्धा त्याग करावा लागत आहे. ज्या काँग्रेसने देशात इतकी वर्षे राज्य केलं. महाराष्ट्रातही दीर्घ काळ काँग्रेस पक्ष सत्तेत होता आज त्याच काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा भाऊ होण्याची संधी देखील मिळेनाशी झाली आहे. काँग्रेस जास्त विरोधही करू शकत नाही कारण आघाडी करूनच वाटचाल करण्याची सवय काँग्रेसला झाली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर काँग्रेसची अनेक वर्षांपासूनची आघाडी आहे. त्यात आता उद्धव ठाकरेंनाही वाव द्यावा लागत आहे.
तिढा कायम! आधी घोषणा मग माघार का?, उद्धव ठाकरे चार ते पाच जागी उमेदवार बदलण्याची शक्यता
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जिंकण्याचा प्रचंड विश्वास असताना काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढत दिली होती. त्यामुळे पराभवाची संपूर्ण जबाबदारी काँग्रेसवर पडली. याच कारणामुळे संजय राऊत, शरद पवार काँग्रेसला सहज दबावात आणू शकत आहेत आणि त्यांच्या अटीही मान्य करायला लावत आहेत. समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात काँग्रेसची अशीच अवस्था केली आहे. तेथील पोटनिवडणुकीत काँग्रेसने सपशेल माघार घेतली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार नाही. अशा परिस्थितीत इंडिया आघाडीत राहणे काँग्रेसला आवश्यकच आहे. हीच आघाडी काँग्रेससाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरत आहे हे देखील नाकारता येत नाही.