Download App

CM शिंदेंच्या मतदारसंघात ट्विस्ट! काँग्रेसच्या बंडखोरीने केदार दिघेंची डोकेदुखी वाढणार

Eknath Shinde vs Kedar Dighe : राज्यातील सर्वात हायहोल्टेज लढत ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात होते. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना मैदानात उतरवलं आहे. एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) मतदारसंघातच घेरण्याची पूर्ण तयारी ठाकरे गटाने केली आहे. मात्र अशातच ठाकरेंना धक्का देणारी बातमी आली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे माजी नगरसेवक राहिलेल्या मनोज शिंदे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मनोज शिंदे यांच्या उमेदवारीने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. जर पुढील चार दिवसांत शिंदे यांनी अर्ज मागे घेतला नाही तर केदार दिघे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

CM शिंदेंना बालेकिल्ल्यात आव्हान देणारे केदार दिघे आहे तरी कोण, जाणून घ्या सर्वकाही 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे यांना राजकीय गुरू मानत असल्याने त्यांच्या विरोधात ठाकरेंनी थेट आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या प्रत्येक भाषणाची सुरुवात आनंद दिघे यांच्या नावाने करत असतात त्यामुळे कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे विरुद्ध दिघेंमध्ये थेट लढत होईल असे सांगितले जात होते. मात्र मनोज शिंदे यांच्या उमेदवारीने यात मोठा ट्विस्ट आला आहे.

मनोज शिंदे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांनी याआधी २००९ मध्ये याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना फक्त ३२ हजार ७७६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना ७३ हजार ५०२ तर मनोज शिंदे यांना ४० हजार ७२६ मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या राजन गावंड यांन ३५ हजार ९१४ मते मिळाली होती.

मनसेचं ठरलं, CM शिंदेंच्या विरोधात उमेदवार देणार नाही; राजकीय ट्विस्टचं कारण..

महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाला होता. ठाकरेंनी येथून केदार दिघे यांना तिकीट दिलं. त्यामुळे मनोज शिंदे नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस कोकणातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. परंतु, काहीच तोडगा निघाला नाही त्यामुळे अपक्ष अर्ज दाखल केला आहे असे मनोज शिंदे यांनी सांगितले. मनोज शिंदे यांनी जर उमेदवारी मागे घेतली नाही तर या मतदारसंघात केदार दिघे यांच्यासाठी लढत आणखी आव्हानात्मक होणार आहे.

मनसेच्या निर्णयाने एकनाथ शिंदेंना बळ

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीत उतरले आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेही तगडा उमेदवार दिला आहे. यानंतर मनसे या मतदारसंघात उमेदवार देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र निवडणुकीआधीय या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं निश्चित केलं आहे.

follow us