Shegaon Assembly Constituency: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून (Shegaon Assembly Constituency) जनशक्ती विकास आघाडीच्या हर्षदा काकडे (Harshada Kakade) या रिंगणात उतरल्या आहे. गेल्या चार टर्म जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या काकडे यांनी भाजपच्या (BJP) विद्यमान आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. भाजपमध्ये असताना त्यांना विधानसभेच्या निवडणुकीला कसा फटका बसला, त्यांचे तिकीट कसे कापले गेले, या मागची स्टोरी त्यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.
हर्षदा काकडेंच्या एन्ट्रीने राजळे, ढाकणेंचं टेन्शन वाढलं; शेवगाव-पाथर्डीचं गणित काय?
हर्षदा काकडे म्हणाले, मी 1997 ते 2022 पर्यंत जिल्हा परिषद सदस्य राहिले आहे. मी वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून आले आहे. 2009 ची विधानसभा लढण्यासाठी आम्ही भाजपकडे मुलाखत दिली. भाजप नेते नितीन गडकरी व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी भाजपमध्ये दुसरे कोणी नव्हते, आमच्याशिवाय. पण अचानक प्रताप ढाकणे यांची भाजपमध्ये एन्ट्री झाली. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले की जोपर्यंत ते भाजपमध्ये आहेत, तोपर्यंत त्यानांच विधानसभेचे तिकीट देणार आहोत, असे ठरलेले आहे. त्यामुळे मी तेव्हाच बंडखोरी केली. तेव्हा निवडणुकीची तयारी केलेली नव्हती. त्यावेळी लोकांनी अपक्ष स्वीकारले नाही.
जागा मोकळी झाली, तिकीट मिळाले पण…
2014 च्या विधानसभेला प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आमच्यासाठी जागा मोकळी झाली. तेव्हा आम्ही भाजपकडून लढण्यासाठी एकमेव होतो. तेव्हा माझे पती शिवाजीराव काकडे यांना तिकीट देण्यात आले. आमच्या दोघापैकी कुणाला तिकीट जाहीर झाले असले तरी ते आम्हाला चालत होते. तिकीट मिळाल्यानंतर एबी फॉर्मवर माझ्या पतींची सही झाली. देवळाली प्रवरा येथील चंद्रशेखर कदम हे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्याकडे एबी फॉर्म आला. त्यांच्याकडे सही झाली. त्यांनी सांगितले पुढे जावून सभेची तयारी करा. सकाळी येतो आणि एबी फॉर्म घेऊन येतो. आपण फॉर्म भरू. काकडेसाहेब हे शेवगावला आले. सभेची तयारी केली. सकाळी सभा सुरू केली. पंधरा ते वीस हजार लोक शेवगावला सभेसाठी आले होते. लोकांचे भाषणे सुरू होते. अचानक काकडेसाहेब यांना एका राष्ट्रवादीच्या नेत्याचा फोन आला. तुम्ही, सभा कशासाठी घेता आहात ? तुमचे तिकीट कापले आहे. मोनिका राजळे या फॉर्मात भरत आहे. हे आमच्यासाठी हे धक्कादायक होते. पण साहेब हे अधात्मामध्ये असल्याने त्यांनी तो धक्का सहन करत भाषण करणारे व्यक्तीला खाली बसवून त्यांनी भाषण सुरू करून भारतीय जनता पार्टीवर भाषण केले. कदाचित तिकीटामध्ये गडबड झालेली आहे. तरी सुध्दा मुंडेसाहेबांना श्रद्धांजली म्हणून भाजपमध्ये राहायचे आहे, असे त्यांनी सांगितले.