Sanjay Shirsat : राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (Maharashtra Elections 2024) मतदान झालं. उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं. आता शनिवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच महायुती आणि महाविकास आघाडीकडून सरकार स्थापनेचे दावे होऊ लागले आहेत. यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी (Sanjay Shirsat) धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिरसाट यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar) संभाव्य युतीचे संकेत दिले आहेत.
संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ शिंदे शिवसेना आणि शरद पवार गट यांच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारला. त्यावर शिरसाट म्हणाले, यासंदर्भातील कोणताही निर्णय एकनाथ शिंदे हेच घेतील. आम्ही त्यावर काही भाष्य करणार नाही. शिंदे साहेब नेहमीच योग्य दिशेने जातात असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आम्ही शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ. ते जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच विजयी होणार यात काहीच प्रश्न नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून काय तो निर्णय घेतील. आम्ही ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्याच चेहऱ्यावर लढली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच (Eknath Shinde) राज्याचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास आहे, असे आमदार संजय शिरसाट म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. महायुतीत काय असे विचारले असता फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रिपदाबाबत अजून कोणतीच चर्चा झालेली नाही. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तिन्ही पक्ष एकत्रित बसून योग्य निर्णय घेतला जाईल असे फडणवीस म्हणाले. आता साधारणपणे मतदानाची टक्केवारी वाढली आहे त्यात सरकारच्या बाजूने लोकांचा कल असू शकतो असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
उत्तर महाराष्ट्रात गुलाल कुणाचा? महायुती की मविआ? एक्झिट पोलचा अंदाज काय..