Assembly Elections 2024 : विदर्भातील जागा जिंकण्याचा प्लॅन ठरला? अमित शाहांनी फडणवीस, बावनकुळेंना दिले ‘टार्गेट’
Maharashtra Assembly Elections 2024, Amit Shah Vidarbha 45 Plus Plan: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी
( Maharashtra Assembly Elections 2024) भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. भाजपचे हायकमांड आणि गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभेला भाजपला (BJP) बालेकिल्ल्यात जोरदार धक्का बसला होता. त्यामुळे अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. विधानसभेला सामोरे जाण्यासाठी अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. तसेच विदर्भातील किती जागा जिंकल्या पाहिजे, याचे टार्गेटही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व इतर पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
BJP : भाजपचे तीन कॅप्टन ठरले; तीन नेत्यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या रणांगणात उतरणार…
विदर्भातून पक्षाने 45 पेक्षा जास्त आमदार निवडून आणले पाहिजे, असे अमित शाह यांनी सभेत सांगितले. मी प्रामणिकपणे सांगतो की पक्षाबाहेरून आलेल्या नेत्यांना वरचढ होऊ देणार नाही. पक्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्ता नेत्यांना जास्त काही देऊ शकत नाही. तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना काय देणार आहे ? मतदान केंद्रावर ताकद लावून काम करा. सहकार क्षेत्र, धार्मिक क्षेत्रातील लोकांना पक्षाबरोबर जोडा. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीत बॅकफूटवर टाका. त्यांची ताकद राहू देऊ नका, असे अमित शाह म्हणाले.
या निवडणुकीसाठी प्रामाणिक कार्यकर्तेही घरात बसून राहणार नाहीत. आम्ही नकारात्मक विचारात पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला जिंकण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना केले आहे.
मतदान वाढविण्यासाठी काय प्लॅन सांगितला?
विदर्भात काँग्रेसला चांगले यश आले तर ते सत्तेच्या जवळ जाातील. त्यामुळे काँग्रेस पक्षाला विदर्भात रोखले पाहिजे. त्यांचे उमेदवार पराभूत करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले मतदान वाढविण्याची बूथ प्रमुखांची जबाबदारी आहे. बूथवर दहा टक्के मते वाढली पाहिजे. त्यासाठी विजयादशमी ते धनत्रयोदशी या अकरा दिवसांच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांनी बुथ क्षेत्रात बाईक रॅली काढाव्या, प्रचार करावा, अशा सूचना शाह यांनी दिल्यात. तसेच, प्रत्येक बुथच्या कार्यक्षेत्रातील साधू, संत, महंत यांना भेटून त्यांचे सत्कार करा आणि भाजपची निवडणूक येत आहे असं त्यांना सांगा, असा सल्ला शाह यांनी दिला आहे.