छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेनेची धूळधाण, भाजपचे अतुल सावे कसे ठरले ‘जायंट किलर’
छत्रपती संभाजीनगर शहरात भाजप आणि शिवसेनेची शहरात युती होईल अशीच चर्चा निवडणूक जाहीर झाल्यापासून होती. ती तुटली, भाजप बहुमतात कशी आली?
कधीकाळी छत्रपती संभाजीनगर हे शहर शिवसेना (Shivsena) या पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होतं. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग या शहरात होता. महानगरपालिकेपासून विधानसभा आणि लोकसभेपर्यंत एकहाती सत्ता मिळेल इतका दबदबा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि शिवसेना पक्षाचा या शहरात होता. परंतु, 2022 ला शिवसेनेत दिर्घकाळापासून कार्यकर्ता ते मंत्री पदापर्यंत काम करणारे एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. आणि पक्षाचे सरळ सरळ दोन तुकडे झाले. दोन तुकडे झाल्यानंतर आज या पक्षाची गेली अनेक वर्षांची सत्ता आता भाजपकडं वळली. भाजपने थेट बहुमतात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर यश मिळवलं आहे.
भाजप आणि शिवसेनेची शहरात युती होईल अशीच चर्चा निवडणूक जाहीर झाल्यापासून होती. परंतु, भाजप आणि शिवसेना युतीची चर्चा चालू असली तरी पालकमंत्री संजय शिरसाट आणि भाजपमंत्री अतुल सावे यांच्यातील सुप्त संघर्ष उफाळून आला तर ही युती होणार नाही हेही तितकचं खर होतं. कारण, संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं तेव्हाच ते पालकमंत्री होती अशी चर्चा होती. त्यावेळी शिवसाट मंत्री झाले तरी ते पालकमंत्री होऊ नयेत अशी इच्छा सावे यांची होती परंतु तसं न होता शिरसाट यांना पालकमंत्रीपद भेटलं. त्यानंतर या दोन नेत्यांमधील वर्चस्वाची लढाई अधिक टोकदार होत गेली. युती करून जर शिवसेनेलाच जागा जास्त मिळाल्या तर आपल्याला इथही काही संधी राहणार नाही असं वाटल्याने आणि शिरसाट पालकमंत्री असले तरी आपणही काही शहरात कमी नाहीत असं दाखवण्यासाठी सावे यांनी टोकाची भूमिका घेतली. अखेर जागावाटपाच्या चार-पाच बैठकांनंतर युती तुटली आणि या निवडणुका स्वतंत्रपणाच्या रिंगणात गेल्या.
मुंबई महानगरपालिकेचा निकाल! मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
यामध्ये भाजप इथे 97 जागांवर निवडणूक लढला तर शिवसेना शिंदे गटही 92 जागांवर मैदानात उतरला होता. यानंतर शिरसाट यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला उमेदवारी दिली. तोच मुद्दा उचलून विरोधकांनी आपल्या मुला-मुलीसाठी शिवरसाटांनी युती तोडली असा थेट आरोप करणं सुरू झालं. त्याचबरोबर आजपर्यंत आमच्या आधारावरच येथे तुम्ही सत्तेत होता आता आम्हालाच दूर करण्याचा प्रयत्न असेल तर त्यांना संभाजीनगरकर उत्तर देतील अशा आशयाचा प्रचार सुरू झाला. यामध्ये भाजपकडून टोकदार उत्तर प्रतिउत्तर देण सुरू झालं. शरहभरात नाराजांची फौज समोर आली. पंरतु, भाजपमंत्री सावे, माजी मंत्री भागवत कराड आणि स्थानिक नेत्यांनी ताकद लावून सर्वांची नाराजी दूर करत आपल्या अधिकृत उमेदवाराला कुठच दगा फटका होणार नाही याची काळजी घेतली. मंत्री सावेही नाराजांच्या दारोदार गेले आणि विजयी निश्चित करत गेले.
यामध्ये स्थानिक नेत्यांसह मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, आमदार माजी खासदार अशा सर्वांना मेहनत घेतली आणि अखेर कधीकाळी शिवसेना या पक्षाचा बालेकिल्ला मानलं जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शरहातील महानगरपालिकेत भाजपने 115 जागांपैकी 97 जागा लढून 58 जागी विजय मिळवत बहुमत मिळवंल आहे. तर, पालकमंत्री संजय शिरसाट शहरात नेतृत्व करत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा किमान 25 जागांवर विजय होईल असं मानलं जात असताना त्यांना केवळ 12 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडं, शिवसेना ठाकरे गटाला 97 जागांवर लढून केवळ 6 जागांवर यश आलं आहे. यामध्ये एमआयएमने मोठी मुसंडी मारत तब्बर 33 जागा जिंकत दुसरा नंबर कायम ठेवला आहे.
