Rana Jagjitsingh Patil : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला. आमदार राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjitsingh Patil) यांनी देखील झंझावती प्रचार सुरू केला. प्रचारफेरी आणि पदयात्रेच्या माध्यमातून ते मतदारांशी संवाद साधत आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर सुरू असून ते प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी आणि सरकारकडून आणखी विकास निधी खेचून आणण्यासाठी पुन्हा एकदा सेवेची संधी द्या, असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं.
संग्राम जगतापांना माझ्यापेक्षा अधिक लीड देवून विजयी करा; सुजय विखेंचे आवाहन
जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी
राणा जगजितसिंह पाटील यांची निवडणूक प्रचारार्थ वाघोली येथे आशीर्वाद यात्रा संपन्न झाली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले, डॉ.पद्मसिंह पाटील साहेबांनी पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे वाघोली व परिसरात शेतीसाठी पाण्याची मोठी सोय झाली. त्यामुळेच वाघोली आज ऊसाचे भांडार म्हणून ओळखले जात आहे. साहेबांच्या विकासाचा हा वारसा आपण पुढे नेत आहोत. गावाच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षात भरपूर विकास निधी दिला आहे. महायुती सरकारच्या माध्यमांतून जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत, असं ते म्हणाले.
ते म्हणाले, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेला कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतिम टप्यात आहे. वर्ष अखेरीस पश्चिम महाराष्ट्रातील पाणी रामदरा तलावात येत आहे. कौडगाव एमआयडीसी यासह मतदार संघातील अनेक योजना प्रगतीपथावर आहेत. शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने आपला पाठपुरावा राहिल्याचं आमदार पाटील म्हणाले.
विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार..
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेच्या माध्यमातून महायुती सरकारने महिलांचा सन्मान केला आहे. मात्र विरोधक या योजनेबद्दल अपप्रचार करत आहेत. ही योजना बंद होणार नाही, कारण महायुती सरकारने पुरेशी तरतूद करून ठेवली आहे. महायुती पुन्हा सत्तेवर येणार असून या योजनेतील रक्कम वाढून मिळणार असंही राणा जगजितसिंह पाटील म्हणाले.
दरम्यान, जिल्ह्यातील मोठे प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी तसेच सरकारकडून आणखी विकास निधी खेचून आणण्यासाठी आपल्या आशीर्वाद आवश्यक आहे. त्यामुळे येत्या २० तारखेला कमळ चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्क्याने विजयी करून पुन्हा एकदा सेवेची संधी द्या, असं आवाहनही पाटील यांनी केलं.