Download App

कोट्यावधी रूपयांचं घर, गाड्या अन् सोनं-चांदी; प्रियांका गांधीची एकूण संपत्ती किती? घ्या जाणून

Priyanka Gandhi Net Worth : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं जाहीर केलंय. प्रियांका गांधी यांनी त्यांच्या नामनिर्देशनपत्रासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, 2023-2024 या आर्थिक वर्षात त्यांचे एकूण उत्पन्न 46.39 लाख रूपये होते.

प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात भाजप उमेदवार नव्या हरिदास या मैदानात आहेत. वायनाडमध्ये 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. कालपेट्टा येथील जिल्हा मुख्यालयात प्रियांकाच्या नामांकनावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील उपस्थित होते.

झारखंडमध्ये बदललाय घराणेशाहीचा ट्रेंड; मुलगा नाही तर सूना सांभाळताहेत राजकीय वारसा

प्रियंका गांधी यांच्याकडे 4.24 कोटी किमतीची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये तीन बँक खात्यांमध्ये वेगवेगळ्या रकमांच्या ठेवी, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, PPF, पती रॉबर्ट वाड्रा यांनी भेट दिलेली होंडा CRV कार आणि 1.15 कोटी रूपये किमतीचे 4400 ग्रॅम सोने यांचा समावेश आहे. प्रियांका गांधी यांची स्थावर मालमत्ता 7.74 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. यामध्ये नवी दिल्लीच्या मेहरौली भागातील दोन वारसाहक्की अर्धा वाटा आणि फार्महाऊस इमारतीतील अर्धा वाटा समाविष्ट आहे.

त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशातील शिमला येथे निवासी मालमत्तेची मालकी आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्याची किंमत सध्या 5.63 कोटी रूपये आहे. त्यांचे पती उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे 37.9 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि ₹27.64 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
प्रियंका गांधी वाड्रा यांनी घोषित केलंय की, त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ संडरलँड, यूके येथून दूरस्थ शिक्षणाद्वारे बौद्ध अभ्यासात पदव्युत्तर पदविका आणि दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात बीए ऑनर्सची पदवी घेतलीय.

झिम्बाब्वेचा सर्वात मोठा विजय अन् रेकॉर्डही.. गाम्बिया ५४ धावांतच ऑलआऊट!

प्रियांका गांधीकडे 15.75 लाख रूपयांचे दायित्व आहे. 2012-13 च्या मूल्यांकन वर्षासाठी त्यांना प्राप्तिकर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. ज्यानुसार त्यांना 15 लाखांहून अधिक कर भरावे लागेल, असं प्रियांका गांधींच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. याव्यतिरिक्त त्यांच्याविरुद्ध दोन एफआयआर आणि वनविभागाची नोटीस असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. नंतर त्यांनी केरळ मतदारसंघाचा त्याग केला. त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा काँग्रेसकडून पोटनिवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.

 

follow us