अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस! कुणी रडलं, कुणाची आत्मदहनाची धमकी तर कुणाची दगडफेक
आज महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी नाराजांनी आपला राग व्यक्त केला.
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी (Election) अर्ज दाखल करण्याचा आज मंगळवार (दि. 30 डिसेंबर) शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड उडताना दिसली. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर या महानगरपालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी हायव्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला.
आता 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला एकाच दिवशी 29 महानगरपालिकांमध्ये मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. परंतु, आज अनेक ठिकाणी कार्यकर्ते आपल्या पक्षातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. कुठं दगडफेक, कुठ कार्यालयाची तोडफोड तर कुठ आत्महनाचा इशारा अशा घटना राज्यभरातील महानगरांत घडल्याचं आज पाहायला मिळालं.
भाजपने उमेदवारी कापली ! माजी नगरसेवक अमोल बालवडकर राष्ट्रवादीत, अजितदादांनी थेट तिकीट दिले
यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईत ठाकरे बंधू Vs शिवसेना-भाजप युती VS काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची प्रचंड धावपळ झाली. शिवसेना, भाजप, काँग्रेस, मनसे, ठाकरे गटाने अनेक उमेदवारांना सोमवारी रात्री एबी फॉर्म दिले. त्यामुळे आज या सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसंच, उमेदवारी न मिळालेल्या नाराजी इच्छूकांनी बंडाचा झेंडा फडकावला. त्यामुळे मुंबईतील सर्वच राजकीय पक्षांमध्ये मंगळवारी बंडखोरीला ऊत येताना दिसला.
मुंबई महानगरपालिका
मुंबई ठाकरे गटाच्या सूर्यकांत कोळी, प्रीती पाटणकर, चंद्रशेखर वायंगणकर, अनिल कोकीळ यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाचे निशाण फडकावले. तर भाजपमध्ये वॉर्ड क्रमांक 200 मध्ये गजेंद्र धुमाळ, संजय दास्ताने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. गोरेगावमध्ये भाजपचे विधानसभा महामंत्री संदीप जाधव यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, मुलुंडमध्ये विधानसभा महामंत्री प्रकाश मोटे, कमलाकर दळवी यांनीही पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. शिंदे गटाने आपल्या उमेदवारांना थेट एबी फॉर्म देऊन शेवटपर्यंत आपल्याकडून कोण लढणार, याचा पत्ता लागून दिला नाही.
पुणे महानगरपालिका
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपावरुन प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. शिंदे गटाचे नाना भानगिरे यांनी सकाळी शिवसेना-भाजप युती तुटल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून 165 जागांवरील उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यात आले. परंतु, त्यानंतर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी भाजप-शिवसेना युती तुटली नसून चर्चा अजूनही सुरु असल्याचं म्हटलं. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरले. तर दुसरीकडे अजित पवार यांच्याकडून आज दिवसभर उमेदवारांना बोलावून एबी फॉर्म वाटण्याचे काम सुरु होते.
अजित पवार यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गजा मारणे याच्या पत्नीला उमेदवारी दिली. तसेच आयुष कोमकर हत्याप्रकरणातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, पुण्यात कोणाचीही युती न झाल्याने भाजप Vs शिंदे सेना Vs राष्ट्रवादी अजित पवार Vs राष्ट्रवादी शरद पवार Vs महाविकास आघाडी ( काँग्रेस , उबाठा आणि वंचित ) अशा बहुरंगी लढतीचे चित्र दिसून आले.
ठाणे महानगरपालिका
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड लगबग पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काल रात्री बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. मनसे, ठाकरे गट, शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. ठाणे महानगरपालिकेत मनसे, ठाकरे गट, शरद पवार गट एकत्र लढत आहेत. तर शिंदे गट आणि भाजप एकत्र लढ आहेत. अजित पवार गट आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष ठाण्यात स्वबळावर लढत आहेत.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार राडा पाहायला मिळाला. सर्वप्रथम शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपशी युती तोडल्याचे जाहीर केलं. यानंतर मनपा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार राडा झाला. उमेदवारी न मिळालेल्या भाजपच्या काही महिला उमेदवारांनी अतुल सावे आणि भागवतराव कराड यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी एक महिला चक्कर येऊन कोसळली. एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय सिरसाट यांनी मुलगा सिद्धांत मुलगी हर्षदाला उमेदवारी दिली. शिंदेंसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुलगा ऋषिकेश याला उमेदवारी दिली. अंबादास दानवे यांनी भाऊ राजेंद्रला उमेदवारी दिली. चंद्रकांत खैरे यांनी पुतण्या सचिन आणि मुलगा ऋषिकेशला उमेदवारी दिली. परभणी महानगर पालिकेसाठी दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद झाली. परभणी महापालिकेत भाजपचे नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी मीनाताई वरपुडकर, काँग्रेसचे नेते माजी खासदार तुकाराम रेंगे यांचे चिरंजीव दत्तराव रेंगे, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव गणेश देशमुख,यांना उमेदवारी मिळाली आहे.
परभणीत अजित पवार राष्ट्रवादीने 57 तर शरद पवार राष्ट्रवादीने 8 ठिकाणी अशा सगळ्या 65 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. परभणीत शिवसेना भाजप युती तुटली. भाजपने 45 ठिकाणी तर शिवसेनेने 30 ते 34 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. उबाठा आणि काँग्रेस परभणीत काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढणार आहेत. परभणीतील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. एकनाथ शिंदेचे माजी जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे, काँग्रेसच्या माजी महापौर अनिता सोनकांबळे यांचे तिकिट कापण्यात आले त्यांच्या पतीने अपक्ष अर्ज दाखल केला.
नाशिक महानगरपालिका
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच तिकीट मिळण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यातच भाजपच्या काही इच्छुक उमेदवारांनी थेट एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे या सुद्धा या ताफ्यामध्ये होत्या. यानंतर भाजपकडून पोलिसांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात एबी फोर्मचे वाटप करण्यात आले. यावेळी काही इच्छुक उमेदवारांकडून तिकीट वाटपाचा काळाबाजार सुरु असल्याचा आरोप देखील करण्यात आला. तर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील तिकीट वाटप सुरु असलेल्या ठिकाणी भेट दिली.
भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्याना डावलल्याने कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली होती. तसेच, कारागृहात असलेल्या भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेते सुधाकर बडगुजर यांनी देखील अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नाशिकमध्ये भाजपविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीने शड्डू ठोकलाय. आता नाशिक महापालिका निवडणुकीत सर्व पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नांदेड महानगरपालिका
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. माजी भाजप महानगराध्यक्षा प्रवीण साले यांच्या मुलीला उमेदवारी मिळाली. महायुतीमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची नांदेडमध्ये युती झाली आहे. परंतु आमदार बालाजी कल्याणकर यांचा युतीला विरोध शेवटपर्यंत कायम राहिला. नांदेड उत्तरमध्ये शिवसेना 40 जागा लढणार आहे. तर काँग्रेस आणि वंचितची यांचीही नांदेडमध्ये युती झाली आहे. उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी सोबत काँग्रेसने युती केलेली नाही.
कोल्हापूर महानगरपालिका
राज्यात केवळ कोल्हापूरमध्ये महायुती झाली आहे. 81 जागांमध्ये भाजप मोठा भाऊ झाला आहे. भाजप 36 जागांवर, शिवसेना 30 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसकडून 74 जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. ठाकरे गटाला सात जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेच्या राहुल चव्हाण यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेसकडून विक्रम जरग यांनी बंडखोरी केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक सुभाष रामगुडे यांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. भाजपच्या यादीत प्रभाग क्रमांक 20 मध्ये एका नावात बदल करण्यात आला आहे. याठिकाणी सुप्रिया सुनील वाडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जालना महानगरपालिका
जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती स्वतंत्र लढत आहे, भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र लढत असल्याचं जाहीर केले आहे. वंचित वगळता काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्रित आलेली आहे. माजी आमदार आणि नुकताच काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले कैलास गोरंटल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल आणि मुलगा अक्षय गोरंट्याल यांना जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तिकीट देण्यात आले आहे. तर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
शिंदे गट आणि भाजपामधील जागावाटपात शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही. त्यामुळे अमरावतीत शिवसेना स्वबळावर लढणार आहे. अमरावतीत भाजपा आणि शिवसेना युती फुटण्याचा खापर शिवसेना नेते कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी भाजपनी दिलेल्या अयोग्य जागा आणि त्याठिकाणी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीने उमेदवार उभे करून केलेली दगाबाजीवर फोडलं.
लातूर महानगरपालिका
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असून महापालिकेतील सर्वच्या सर्व 70 जागा लढवणार असल्याची माहिती भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर महानगरपालिका
महापालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोलापुरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. सोलापूर महापालिकेच्या 102 जागासाठी मागील पाच दिवसात केवळ 350 अर्ज दाखल केले. मात्र सर्वच राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस निवडल्याने अर्ज भरण्यासाठी तारांबळ उडाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकाच वेळी गर्दी आल्याने गर्दीचे नियंत्रण करताना पोलिसांचे मोठे हाल झाले.
कुपवाडा महानगरपालिका
कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. त्यामुळे या मुदतीच्या अगोदर नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली. बरोबर तीन वाजता निवडणूक विभागाने निवडणूक कार्यालयाने दरवाजे बंद केले. तिन्ही शहरात मोठ्या संख्येने अखेरच्या दिवशी अर्ज दाखल झाल्यामुळे मोठी चुरस निर्माण होणार आहे. या निवडणुकांमध्ये भाजपा समोर बंडखोर तसेच शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीचं मोठं आव्हान ठिकठिकाणी निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये काट्याची टक्कर होण्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
धुळे महानगरपालिका
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसून भाजपकडून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रतिसाद न मिळाल्याने यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता यानंतर शिवसेना शिंदे गटासोबत भाजपाची चर्चा सुरू असताना भाजपाने अत्यंत अल्पशा जागा शिवसेना शिंदे गटाला देऊ केल्या होत्या. मात्र सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याने अखेर शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
चंद्रपूर महानगरपालिका
महानगरपालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युतीसाठी सुरू असलेली बोलणी फिस्कटली. राष्ट्रवादी काँग्रेस 40 जागांवर उमेदवार देण्यात आले. भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर न करता उमेदवारांना झोन कार्यालयात निवडणूक अर्ज भरण्यासाठी बोलवण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली असून भाजपने 66 जागांपैकी 58 जागा स्वतःकडे ठेवल्या आहेत आणि शिवसेनेला 8 जागा दिल्या आहेत मात्र शिवसेनेकडे असलेल्या 8 जागांमध्ये 3 उमेदवार हे भाजपचे आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेवटच्या क्षणी बोलणी फिस्कटल्याने वेगळी चूल मांडली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष स्वबळावर महापालिकेची निवडणूक लढवत आहे. काँग्रेस सर्व 66 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवत आहे… तर शिवसेना उबाठा गटाने वंचित बहुजन आघाडी सोबत युती करत 33-33 जागांवर उमेदवार दिले आहेत. काँग्रेस सोबत बोलणे फिस्कटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 55 जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले आहेत.
अकोला महानगरपारिका
अकोला महापालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युतीची घोषणा झाली. काही जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा होताय. मात्र, राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे यांच्या चर्चेतून अखेर तिढा सुटला. भाजप आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा केलीय. 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढणार तर उर्वरित जागांवर भाजप उमेदवार देणारेय. या घोषणेमुळे अकोल्यात शिंदेंची सेवा एकटी पडलीय. आता या महायुतीतील दोन्ही पक्षांशी शिंदोंच्या सेनेची अकोला महापालिकेत मैत्रीपूर्ण लढत पहायला मिळणार आहे.
