भाजपने उमेदवारी कापली ! माजी नगरसेवक अमोल बालवडकर राष्ट्रवादीत, अजितदादांनी थेट तिकीट दिले
Amol Balwadkar : माझ्या कठीण काळात अजितदादांनी माझ्यावरती विश्वास टाकला आहे. तो विश्वास सार्थ ठरवेल. कार्यकर्ता काय असतो भाजपला दाखविणार.
Amol Balwadkar joins Nationalist Congress: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. पुण्यात भाजपने बाहेरच्या पक्षातील अनेक जणांना घेऊन उमेदवारी दिलीय. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांची गोची झालीय. प्रभाग नऊमधून माजी नगरसेवक व पक्षासाठी झटणारे अमोल बालवडकरांचे (Amol Balwadkar) तिकीट भाजपने (BJP) कापले आहे. त्यांचा जागी दुसरा उमेदवार दिल्यानंतर अमोल बालवडकर हे थेट राष्ट्रवादीत (NCP) दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमोल बालवडकर यांना बाणेर भागातील प्रभाग नऊमधून उमेदवारी दिलीय.
Video : फडणवीसांनी शब्द पाळला नाही; चंद्रकांतदादांसाठी झटलेल्या बालवडकरांचा भाजपला रामराम
माझ्या कठीण काळात अजित पवार यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आहे. तो विश्वास सार्थ ठरवेल, असा विश्वास अमोल बालवडकरांनी व्यक्त करताना भाजपला इशारा दिला आहे. भाजपाची हुकूमशाही चालणार नाही. कुठलाही पक्ष मोठा व्हावा मात्र पाय जमिनीवर ठेवावेत अमोल बालवडकर आता दाखवून देईल की भाजपाला कार्यकर्ता काय असतो, असे इशारा त्यांनी दिलाय. भाजपाला या निवडणुकीत धोबीपछाड देणार आहे. त्यांनी धोका दिला असल्याचे बालवडकरांनी म्हटले आहे.
फडणवीसांनी शब्द पाळला नाही-बालवडकर
विधानसभेसाठी चंद्रकांत पाटलांचा विजयासाठी झटलेल्या अमोल बालवडकरांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याने माघार घेतली एक लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटलांना निवडून आणलं त्यानंतर भाजपाने माझ्यासोबत दगा फटका केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला नाही. ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली त्यामुळे मी दादांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बालवडकर यांनी सांगितले. मला दोन दिवस अगोदर जरी सांगितलं असतं तरी मी ऐकलं असतं मात्र जे काही झालं यामध्ये भाजप पक्षाचे नुकसान आहे माझं नाही.मी राष्ट्रवादीत गेल्याने माझ्यापेक्षा जास्त भाजपाला नुकसान होणार असून, याचा फटका भाजपा बसेल असा इशाराही बालवडकर यांनी दिला आहे.
लहू बालवडकर भाजपचे उमेदवार
प्रभाग क्रमांक नऊ मधून लहू बालवडकर यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरूड विधानसभा निवडणुकीदरम्यान अमोल बालवडकर यांनी आपण स्थानिक असल्याचा मुद्दा पुढे करत चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उघड बंड पुकारले होते. मोर्चे, बैठकांमधील नाराजी आणि थेट विरोधामुळे हा वाद इतका पेटला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मध्यस्थी करावी लागली होती. मात्र, आता त्याच फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा थेट आरोप बालवडकरांनी केला आहे.
