Ashok Rane : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाणारे महाराष्ट्र सरकारचे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार (State Marathi Film Awards) काल जाहीर झाले. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार तर प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, या सोहळ्याकडे चित्रपटसृष्टीतीने कलाकारांनी पाठ फिरवल्यानं चित्रपट अभ्यास आणि दिग्दर्शक अशोक राणेंनी (Ashok Rane) खंत व्यक्त केली.
दिल्ली अन् गुजरातसमोर झुकणारे भाजप सरकार उखडून फेका…; नाना पटोलेंचे आवाहन
राज्य मराठी चित्रपट पुरस्कार नेहमीच्या थाटात दिमाखदार पध्दतीने पार पडला. मात्र या कार्यक्रमाला काही मोजके लोक सोडले तर चित्रपटसृष्टीतील कुणीच नव्हते. ज्यांना पुरस्कार मिळतात तेही आपला पुरस्कार पदरात पडला, हातात बाहुली पडली की निघून जातात, अशी खंत राणेंनी व्यक्त केली.
अशोक राणेंनी फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, काल महाराष्ट्र शासन आयोजित 58वा आणि 59वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार नेहमीच्या थाटात दिमाखदार पध्दतीने पार पडला. नेहमीप्रमाणेच एक गोष्ट खटकली. ज्यांना पुरस्कार मिळाले ते आणि त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि काही मोजके लोक सोडले तर चित्रपटसृष्टीतील कुणीच नव्हते. नाट्यसृष्टीबद्दल तर बोलायलाच नको. चित्रपटसृष्टीशी त्यांचा संबंध फक्त चित्रपट करण्यापुरता आणि त्यातले होतील तेवढे फायदे पदरात पाडून घेण्यापुरता. अन्यथा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या गौरवात सामील व्हायला ते आले असते. एन. चंद्रा, शिवाजी साटम अशा ज्येष्ठ कलावंताना जीवनगौरव सारखे पुरस्कार मिळतात आणि आपण आपापल्या कामात किंवा घरी. चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षात नावारूपाला आलेले तसेच नुकतेच अवतरलेले नवे दिग्दर्शक, लेखक, निर्माते, कलावंत, तंत्रज्ञ यांचा पुरस्कारांनी गौरव होत असताना चित्रपटसृष्टीतील अन्य मंडळींनीही यायला हरकत नसावी. पण ते येतच नाहीत, असं राणेंनी म्हटलं.
मोठी बातमी! डॉक्टरांचा संप मागे, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशचा निर्णय..
पुरस्कार विजेते पुरस्कार मिळाली निघून जातात…
गंमत म्हणजे ज्यांना पुरस्कार मिळतात तेही आपला पुरस्कार पदरात पडला की निघून जातात. पूर्वी ते तरी शेवटपर्यंत थांबायचे आणि थांबलेत म्हणून इतरांसाठी टाळ्या वाजवायचे. कारण त्यावेळी समारंभ संपल्यानंतरच पुरस्काराचे चेक दिले जायचे. त्यामुळे थांबावं लागायचच. आता बाहुली हातात पडली की झालं. पुरस्काराची रक्कम नंतर अकाऊंटमध्ये जमा होणार. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संस्था. तिचेही पदाधिकारी फिरकत नाही. नाट्यपरिषदेबद्दल मग काय बोलावं. आपण वेगळे. ते वेगळे. परंतु शासन मात्र दरवर्षी धूमधडाक्यात पुरस्कार सोहळा साजरा करतं. करत राहणार, असं राणे म्हणाले.
कलावंत म्हणून कृतज्ञता नको वाटायला?
सबंध देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य सरकार आहे की जे सर्व प्रकारच्या कलांसाठी, त्यातल्या कलाकारांसाठी भरघोस असं काही करत असतं. त्यांचं ते कामच आहे हे खरंय. परंतु हे एवढ्या मोठ्या प्रमाणात? त्याच्याबद्दल कलावंत म्हणून आपल्याला कौतुक आणि झालंच तर थोडी कृतज्ञता नको वाटायला? नोकरशाहीविषयी कुणीही उठतं आणि मनाला येईल ते बोलतं. घडतात काही गोष्टी अशा. बोला. परंतु तीच नोकरशाही जेव्हा अशा भव्य समारंभात आपलं कौतुक करते तेव्हा आपण नको का त्यांचंही कौतुक करायला. अक्षरश: आठेक दिवसात सांस्कृतिक खात्याच्या नेतृत्वाखाली दादासाहेब फाळके फिल्म सिटीनं एवढा घाट घातला आणि आपल्याला त्याचं काहीच नाही, अशी खंत राणेंनी व्यक्त केी.
पुढं त्यांनी लिहिलं की, शासनाकडे सतत काही तरी मागायला जाणाऱ्या सर्वच कलाक्षेत्रातील कलावंतांनी मोठ्या उत्साहाने या अशा समारंभांना उपस्थित राहून शासन करत असलेल्या या आपल्याच कुटुंबियांच्या कौतुक सोहोळ्यात सहभागी व्हायला हवे आणि हा केवळ शासनाचा कार्यक्रम नाही तर आपला सर्वांचा आहे, ही भावना मनाशी बाळगायला हवी.
सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके फिल्मसिटीचे सर्व मान्यवर अधिकारी, संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि खात्याचे मंत्रीमहोदय यांचे मी एक सिनेमावाला म्हणून या भव्य आयोजनाबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो, असं म्हणत राणेंनी शासनाचे आभार मानले.