Call Me Bae S2 : कॉलिन डी’कुन्हा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सीरिजमध्ये अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार असून, करण जोहर, अदार पूनावाला आणि अपूर्व मेहता यांनी धर्माटिक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या सीझनची निर्मिती केली आहे. प्राइम व्हिडिओ या भारतातील आघाडीच्या एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल कंटेंट स्ट्रीमिंग सेवेकडून आज सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या हिंदी ओरिजिनल सीरिज ‘कॉल मी बे’च्या दुसऱ्या सीझनच्या जागतिक स्ट्रीमिंग प्रीमियरची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजचा प्रीमियर १७ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे. आठ भागांची ही सीरिज विनोद, ग्लॅमर आणि मैत्री यांचा अनोखा संगम घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी बेचे आयुष्य आणखी गुंतागुंतीचे होणार असून, ती आपल्या प्रेमासोबतच ‘सिस्टरहुड’ म्हणजेच बहिणींच्या नात्यातील खास बॉन्डचीही परीक्षा घेताना दिसणार आहे.
‘कॉल मी बे’ सीझन २ चे दिग्दर्शन कॉलिन डी’कुन्हा यांनी केले असून, करण जोहर, अदार पूनावाला आणि अपूर्व मेहता यांनी धर्माटिक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या सीरिजची निर्मिती केली आहे. सोमन मिश्रा आणि कॉलिन डी’कुन्हा यांनी कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. इशिता मोइत्रा यांनी या सीरिजची निर्मिती केली असून, इशिता मोइत्रा, समीना मोटलेकर, रोहित नायर आणि नित्तल चंद्रराणा यांनी लेखन केले आहे. या नव्या सीझनमध्ये प्रतिभावान कलाकारांची मोठी फळी पाहायला मिळणार आहे. अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार असून, श्रुती कमल हासनदेखील या सीरिजचा भाग असणार आहेत. त्यांच्यासोबत वीर दास, गुरफतेह पीरजादा, वरुण सूद, विहान समत, मुस्कान जाफरी, निहारिका लायरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनी माथुर हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.
बेला ‘बे’ चौधरी (Ananya Panday) विजयाचा उत्साह, मोठी स्वप्ने आणि प्रचंड आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा परतली आहे. तिचे करिअर यशाची नवी शिखरे गाठत असताना, तिचे प्रेमजीवन मात्र तितकेच गुंतागुंतीचे बनले आहे. दोन व्यक्ती तिच्या मनाला आपापल्या दिशेने खेचत असताना, तिला प्रेम, मनःस्ताप आणि स्वतःच्या काही चुकीच्या निर्णयांचा सामना करावा लागणार आहे. आणि बेची गोष्ट तिच्या सर्वाधिक विश्वासू बहिणींसोबतच्या नात्याशिवाय आणि त्यांच्या खास ‘सिस्टर कोड’शिवाय पूर्ण होऊच शकत नाही! यावेळी हा बहिणींचा खास बॉन्ड आणखी मोठा, गुंतागुंतीचा आणि अनेक अनपेक्षित वळणांनी भरलेला असणार आहे, कारण त्यांच्या ग्रुपमध्ये एका नव्या बहिणीची एन्ट्री होणार आहे. यावेळीदेखील बे आपल्या खास अंदाजात प्रत्येक अडचणीचा आणि अनपेक्षित वळणाचा सामना करताना दिसणार आहे. अशा प्रकारे सीझन २ मध्ये प्रेक्षकांना मनोरंजन, मत्सर आणि धमाल गोंधळाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. कारण हा सीझन एका गोष्टीची हमी देतो आणि ती म्हणजे दोन हृदये, एक बे आणि भरपूर ड्रामा!
प्राइम व्हिडिओ आणि अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया ओरिजिनल्स (SVOD) चे डायरेक्टर आणि हेड निखिल मधोक म्हणाले, “एखादी सीरिज किती यशस्वी ठरली आहे, हे खऱ्या अर्थाने तेव्हाच समजते, जेव्हा प्रेक्षक त्या सीरिजमधील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कथांशी किती जोडले गेले आहेत, हे दिसून येते. ‘कॉल मी बे’ ही केवळ एक सीरिज राहिलेली नाही, तर आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे, धमाल विनोदामुळे आणि दैनंदिन आयुष्याशी संबंधित विषयांमुळे ती पॉप कल्चरचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. विशेषतः ‘बेहन कोड’ ही संकल्पना प्रेक्षकांनी सीरिजच्या पलीकडेही आपलीशी केली असून, महिला मैत्री, एकमेकींना साथ देणे आणि प्रत्येक कठीण प्रसंगात एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे याचे ते प्रतीक बनले आहे. धर्माटिक एंटरटेनमेंटसोबत आमचे दीर्घकाळापासूनचे नाते आहे. त्यांनी नेहमीच प्रेक्षकांसाठी नवनवीन आणि रंजक कथा सादर केल्या आहेत. आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा या रंगतदार दुनियेत घेऊन जाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
निर्माते करण जोहर म्हणाले, “पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम आणि शानदार प्रतिसाद यावरून हे स्पष्ट झाले की, बेच्या आयुष्यातील चढ-उतार आणि प्रत्येक परिस्थितीत स्वतःच्या अटींवर जगण्याच्या तिच्या वृत्तीशी प्रेक्षक मनापासून जोडले गेले आहेत. सीझन २ मध्ये आम्हाला ही कथा आणखी पुढे घेऊन जायची होती. यात बेच्या व्यक्तिमत्त्वाचे काही नवे पैलू उलगडण्यासोबतच तिचा तोच मजेशीर स्वभाव, भावना आणि बिनधास्त अंदाज कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, जो प्रेक्षकांना पहिल्या सीझनमध्ये खूप आवडला होता. प्राइम व्हिडिओसोबत पुन्हा एकदा काम करताना आणि बेच्या आयुष्यातील हा नवा टप्पा प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यावेळी बे आणि तिच्या लाडक्या बहिणी हसू, भावना आणि भरपूर धमाल-गोंधळाने भरलेल्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.”
