Conflict erupts between Onkar Bhojane and Milind Kawade : मराठी मनोरंजन विश्वात सध्या अभिनेता ओंकार भोजने आणि दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनेता ओंकार भोजने यांनी पठवलेल्या कायदेशीर नोटिशीला आता दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी वकिलांमार्फत सविस्तर प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, या प्रत्यत्तरात मिलिंद कवडे यांनी अफरातफर चित्रपटाशी संबंधित आर्थिक नुकसानीचा मुद्दा उपस्थित करत तब्बल 4 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे.
अफरातफर या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सुरू झालेला अभिनेता ओंकार भोजने आणि दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्यातील वाद आता अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. ओंकार भोजने यांनी मिलिंद कवडे यांच्याविरोधात बदनामी केल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस पाठवली होती. या नोटिशीत भारतीय न्याय संहितेच्या कलम 356 अंतर्गत बदनामीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या नोटिशीला उत्तर देताना मिलिंद कवडे यांनी आपली बाजू सविस्तरपणे मंडळी आहे. 21 ऑक्टोबर 2026 रोजी वकिलांमार्फत हे कायदेशीर प्रत्युत्तर पाठवण्यात आलं आहे.
या प्रत्युत्तरात मिलिंद कवडे यांनी अफरातफर चित्रपटाच्या शुटिंगपासून ते प्रमोशनपर्यंतच्या अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. शूटिंगदरम्यान ओंकार भोजने वेळेवर सेटवर उपस्थित राहत नव्हते, डबिंगसाठी तारखा देण्यास विलंब झाला, पोस्टर शूटसाठी सहकार्य मिळालं नाही, असे आरोप कवडे यांनी आपल्या नोटिशीत केले आहेत. तसंच चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च, प्रमोशनल कार्यक्रम आणि प्रीमियरला उपस्थित राहण्याबाबत देखील ओंकार भोजने यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याच्या दावा त्यांनी केला आहे.
MPSC विद्यार्थ्यांसाठी दिवाळी गिफ्ट; गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील पदसंख्या वाढली
विशेष म्हणजे, 28 सप्टेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रमोशनल कार्यक्रमासाठी ओंकार भोजने यांनी सुरूवातीला पूर्ण दिवस उपलब्ध असल्याचं कळवलं होतं. मात्र कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी त्यांनी केवळ चार तास उपलब्ध राहू शकणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे नियोजित प्रमोशनल कार्यक्रम रद्द करावा लागल्याचा दावा मिलिंद कवडे यांनी केला आहे.दरम्यान, ओंकार भोजने यांनी पॉडकास्टमध्ये चित्रपटाच्या निर्मितीचा दर्जा, प्रमोशन आणि कराराबाबत केलेल्या वक्तव्यांवर देखील मिलिंद कवडे यांनी आक्षेप घेतला आहे.
मात्र, मुलाखतीत केलेली वक्तव्ये ही कोणाचीही बदनामी करण्याच्या हेतूने नव्हती, तर चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रमोशनदरम्यान आलेल्या व्यावसायिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर ती करण्यात आली होती, अशी भूमिका कवडे यांनी घेतली आहे. मिलिंद कवडे यांनी आपल्या कायदेशीर प्रत्युत्तरात अफरातफर चित्रपटाशी संबंधित आर्थिक नुकसानीचा प्राथमिक अंदाज सुमारे 4 कोटी रुपये असल्याचं नमूद केलं आहे.
मात्र, ही संपूर्ण रक्कम ओंकार भोजने यांच्याकडून वसूल करण्याचा निश्चित दावा नसून, चित्रपटाच्या एकूण आर्थिक नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. करारभंग किंवा अन्य कायदेशीररित्या सिद्ध होणाऱ्या कृतींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित करार, आर्थिक हिशेब, प्रमोशनवरील खर्च आणि इतर पुरावे सादर करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
445 मिलियन डॉलर बुडाले, ट्रम्पही हरले; आता मस्क यांच्या मानगुटावर चौकशीचा ससेमिरा
तसंच ओंकार भोजने यांनी सात दिवसांच्या आत या प्रत्यत्तराला सविस्तर लेखी उत्तर द्यावं, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. अन्यथा योग्य न्यायिक मंचासमोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील मिलिंद कवडे यांनी दिला आहे. एकीकडे ओंकार भोजने यांनी बदनामीचा आरोपावरून कायदेशीर लढाई सुरू केली आहे, तर दुसरीकडे मिलिंद कवडे यांनी चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रमोशनमधील कथित नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
आता या वादात पुढे कोणती कायदेशीर भूमिका घेतली जाते? चार कोटींच्या नुकसानभरपाईचा हा मुद्दा पुढे कोणतं वळण घेतो? आणि ओंकार भोजने यांच्याकडून या प्रत्युत्तराला काय उत्तर दिलं जातं? याकडे संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वाचं लक्ष लागलं आहे.
