एका अनोख्या, रंगेल आणि गुंतागुंतीच्या जगात घेऊन जाणारा नवा मराठी चित्रपट “स्मार्ट सुनबाई” चित्रपटसृष्टीत नवा धमाका करायला सज्ज झालेला आहे. (Film) नुकताच या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित ‘स्मार्ट सुनबाई’ चा टीझर पाहिल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात येते ते म्हणजे ही एक शहरी आणि ग्रामीण मनांची मस्तीखोर जुगलबंदी आहे, जिथे रहस्याचा थर आणि प्रेमाचा स्पर्श आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटाचा टिझर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला, त्यांनी या चित्रपटाच्या संकल्पनेचं, कलाकारांचं तसेच दिग्दर्शकाच्या प्रयत्नांचं मनापासून कौतुकही केलं. टिझरमधील भावनिक आणि विनोदी रंगांची संगम साधणारी झलक पाहून त्यांनी “हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.
‘ताठ कणा’, एका ध्येयवेड्या, डॉक्टरची कथा; लवकरच चित्रपटगृहात
हा टीझर प्रेक्षकांना एका अप्रतिम स्थळावर घेऊन जातो. सुंदर, रमणीय आणि निसर्गरम्य लोकेशन्समध्ये चित्रित झालेला हा चित्रपट केवळ डोळ्यांची मेजवानीच नाही तर भावनांचा, हास्याचा आणि रोमान्सचा परिपूर्ण संगम सादर करतो. शहरातील आधुनिक स्त्रिया आणि गावातील पारंपरिक स्त्रिया यांच्या मजेशीर जुगलबंदीने भरलेला हा सिनेमा प्रेक्षकांना हसवणार, गुदगुल्या करणार आणि शेवटी थोडं विचार करायलाही भाग पाडणार आहे. टीझरमध्ये दिसलेले काही क्षण प्रेक्षकांना दडलेल्या काही गुपितांचा सुगावा देतात. हे रहस्य नेमकं काय आहे? या प्रश्नांची उत्तरे चित्रपटात सोडवली जातील.
या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत आणि लोकप्रिय कलाकारांची प्रभावी फळी एकत्र दिसणार आहे. संतोष जुवेकर,रोहन पाटील , भाऊ कदम, किशोरी शहाणे , सायली देवधर ,मोहन जोशी, दीपक शिर्के, प्राजक्ता हनमघर , प्राजक्ता गायकवाड , उषा नाईक , अंशुमन विचारे , स्नेहल शिदम, विनम्र बाबल,भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे , मोनिका बंगाळ ,आर्या सकुंडे , वैशाली चौधरी , सपना पवार , कांचन चौधरी.
या सर्व कलाकारांची एकत्रित उपस्थितीच ‘स्मार्ट सुनबाई’ ला भव्यतेची उंची देणार असून, त्यांच्या परफॉर्मन्सची अनोखी केमिस्ट्रीच या चित्रपटाची खरी ताकद ठरणार आहे. चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी प्रभावीपणे साकारले असून, विजय नारायण गवंडे आणि साई–पियुष यांनी या चित्रपटाला सुरेल संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांच्या सुंदर लेखणीतून उमटलेली गाणी, तर अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांच्या मधुर आवाजाने सजलेली ही संगीतमय मेजवानी ‘स्मार्ट सुनबाई’ला एक वेगळीच ओळख देणार आहे. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात येत आहे.