मुख्यमंत्री फडणवीस हे देवाभाऊ नसून ते टक्का भाऊ, घेवा भाऊ आणि मेवा भाऊ, हर्षवर्धन पाटील यांचा खोचक टोला
काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
Harshvardhan Sapkal launched a strong attack on the ruling Shiv Sena-BJP : ठाण्याचा दाढीवाला आणि हैदराबादचा दाढीवाला हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सहकारी असून ते मतदारांमध्ये जातीय तेढ निर्माण करून मत मागत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सध्याचे सरकार हे मायबाप सरकार नसून तमाशा करणारे तमासगीर सरकार बनले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ठाण्यात आज काँग्रेस पक्षाचा निवडणूक जाहीरनामा अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी शेलक्या शब्दांत टीका केली.
ठाण्यातील आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळणारे यश हे अनेकांसाठी आश्चर्यजनक ठरेल, असा ठाम दावा सपकाळ यांनी केला. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेली “तू मारायचे सोंग कर, मी रडायचे सोंग करतो” अशी बनवाबनवी आता संपत असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेतील मित्रपक्ष केवळ सत्तेचा लाभ घेत असून बाहेर येऊन टीका करण्याचे ढोंग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महापालिका मतमोजणीविषयी मोठी अपडेट; एकावेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणीमुळे निकाल रखडणार?
सपकाळ पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस हे देवाभाऊ नसून ते “टक्का भाऊ, घेवा भाऊ आणि मेवा भाऊ” आहेत. सरकारची धोरणे ही जनतेसाठी नसून ठेकेदार आणि दलालांसाठी तयार केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली. ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ या घोषणेनंतर आता ‘भाजपपासून बेटी बचाओ’ म्हणण्याची वेळ आली असल्याचा घणाघाती टोला त्यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताना सपकाळ म्हणाले की, पैसा कमी पडत असल्याने त्यांच्या परिवारातील सदस्य ड्रग्जची फॅक्टरी चालवत होते का, हा प्रश्न आता जनतेला पडला आहे. अंबरनाथमध्ये घडलेले प्रकरण हे केवळ एका शहरापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था ढासळली असून भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि सत्तेचा गैरवापर शिगेला पोहोचला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल, असा विश्वास व्यक्त करत सपकाळ यांनी काँग्रेसचा जाहीरनामा हा सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आधारित असल्याचे स्पष्ट केले.
