Download App

चित्रपताका महोत्सवाला दुसऱ्या दिवशी उदंड प्रतिसाद

Chitrapataka Festival : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांची पर्वणी, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द कलाकारांची

  • Written By: Last Updated:

Chitrapataka Festival : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांची पर्वणी, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द कलाकारांची उपस्थिती, परिसंवाद, कार्यशाळा, मुलाखती अशा विविध ढंगात ‘चित्रपताका’ (Chitrapataka Festival) हा राज्याचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव दणक्यात प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत सुरू आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सिनेप्रेमींचा उदंड प्रतिसाद महोत्सवाला लाभला आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चित्रपताका’ हा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सव पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या (P. L. Deshpande Maharashtra Academy of Arts) प्रांगणात सुरू आहे.

24 एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवात 41 दर्जेदार मराठी चित्रपट पाहण्याबरोबरच हिंदी-मरठीतील काही नामवंत कलाकार आणि चित्रपटकर्मींचे विचार ऐकण्याची संधीही सिनेप्रेमींना या महोत्सवाच्या निमित्ताने मिळाली आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘बटरफ्लाय’, ‘पळशीची पीटी’, ‘येरे येरे पावसा’, ‘बाईपण भारी देवा’, ‘विषय हार्ड’, ‘तिचं शहर होणं’, ‘इंटरनॅशनल फालमफोक’, ‘ग्लोबल आडगाव’, ‘या गोष्टीला नावच नाही’, ‘पाणी’, ‘गोदाकाठ’, ‘झॉलिवूड’, ‘भेरा’, ‘चोरीचा मामला’ आणि ‘पाँडिचेरी’ हे चित्रपट दाखवण्यात आले. या चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञांची टीम जातीने महोत्सवाला उपस्थित होती. त्यांनी प्रदर्शनानंतर प्रेक्षकांशी संवादही साधला. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही महोत्सवाला भेट देत ‘इंटरनॅशनल फालामफोक’ हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, गजेंद्र अहिरे, हेमांगी कवी, रसिका आगाशे, छाया कदम, अभिजित साटम, मधुरा वेलणकर, महेश कोठारे, संदेश कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, मुक्ता बर्वे अशा मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकारांनी महोत्सवाला भेट दिली.

गाण्यातून गोष्टी सांगणे हा राष्ट्रधर्म – संगीतकार कौशल इनामदार

‘काल, आज आणि उद्याचे मराठी चित्रपट – गीत, संगीत, शब्द, सूर आणि तंत्र’ या विषयावर चित्रपताका महोत्सवातील पहिली कार्यशाळा संपन्न झाली. प्लेबॅक संगीताचे तंत्र विकसित झाले नव्हते तेव्हापासून ते आत्ता क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करत इथे बसून परदेशात गाणी पाठवण्याची किमया सहजसाध्य होईपर्यंतचा प्रवास उलगडताना मुळात चित्रपटात संगीत, गीत, शब्द, सूर महत्वाचे का ठरतात? याची अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीत संगीतकार कौशल इनामदार यांनी केलेली मांडणी उपस्थित सिनेप्रेमींसाठी भारावून टाकणारा अनुभव ठरला. भारत हा गाणी आणि गोष्टींचा देश आहे. आपल्याकडे छंदातून गोष्ट मांडण्याची परंपरा ही वेदकाळापासून चालत आलेली आहे.

वेद, महाभारत, रामायण यासारखी महाकाव्येच नव्हे तर गणिती ज्ञानही आपल्याकडे छंदातून शिकवले गेले आहे. सुरूवातीच्या काळात ज्ञान प्रसारणाचे कार्य मौखिक पध्दतीने होत असल्याने छंदातून गोष्टी सांगणे प्रभावी ठरले. त्यामुळे एकप्रकारे संगीतातून वा गाण्यातून गोष्टी सांगण्याची पध्दत आपल्या रक्तातच आहे. एखादी गोष्ट सरळ शब्दांत सांगितली तर ते समोरच्याला चटकन समजत नाही, मात्र तीच गोष्ट पद्यातून सांगितली तर शब्दांच्या पलिकडला अर्थ आपल्याला गवसतो आणि म्हणूनच चित्रपटासारख्या दृक् श्राव्य माध्यमात गीत-संगीताचे महत्व कसे अबाधित आहे, हे कौशल इनामदार यांनी विविध उदाहरणे देत कधी निवेदनातून तर कधी गाण्यातून रंजक पध्दतीने उलगडून सांगितले.

चांगले चित्रपट बनवत राहा, प्रेक्षक स्वतःहून शोधत येतील – हंसल मेहता

हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट बनवत चोखंदळ वाटचाल करणाऱ्या प्रसिध्द दिग्दर्शक हंसल मेहता यांची रंगतदार मुलाखत प्रसिध्द अभिनेते, कवी किशोर कदम यांनी घेतली. कमीतकमी निर्मितीखर्चात उत्तम आशय देणारे चित्रपट बनण्यावर हंसल मेहता यांचा विश्वास आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चांगले कलाकार, दिग्दर्शक आहेत, अशा शब्दांत मराठी चित्रपटकर्मींचे कौतुक करणाऱया हंसल मेहता यांनी उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘विहीर’ चित्रपटाचा आपल्यावर किती प्रभाव पडला, याची आठवण सांगताना माझा पहिला चित्रपट मी ‘विहीर’ पाहिल्यावर बनवला असता तर अधिक चांगला करता आला असता, असा विचार चित्रपट पाहिल्यावर आपल्या मनात चमकून गेला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाहीत, अशी तक्रार केली जाते. मात्र, प्रेक्षकांची गर्दी आणि चित्रपटाची कमाई याचा विचार करून चित्रपट बनवू नयेत, असे परखड मत मेहता यांनी व्यक्त केले. नागराज मंजूळे यांनी ‘सैराट’ बनवताना चित्रपट शंभर कोटीची कमाई करेल असा विचार करून बनवला नव्हता. सगळ्या नवोदित कलाकारांना घेऊन त्यांनी आपल्याला हवा तसा चित्रपट बनवला होता. चित्रपट आवडल्यावर प्रेक्षकांनी गर्दी केली, असे सांगत चांगले चित्रपट बनवत राहा… प्रेक्षक स्वतःहून शोधत येतील, असा सल्लाही हंसल मेहता यांनी दिला.

‘झी टीव्ही’वर ‘खाना खजाना’सारख्या शोपासून सुरूवात करत चित्रपट दिग्दर्शनाची वाट कशी सापडली ते रंगभूमीवरच्या आणि नवोदित कलाकारांना घेऊन आशयघन चित्रपट, वेबमालिका करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास या गप्पांमधून उलगडत गेला. 35 लाखांमध्ये ‘शाहीद’ चित्रपट बनवणाऱ्या आणि त्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणाऱ्या हंसल मेहता यांच्यासारख्या प्रथितयश दिग्दर्शकाचे अनुभव आणि त्यांची आजवरची वाटचाल मराठी चित्रपटकर्मींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशी भावना चित्रपताका महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केली.

चित्रपताका महोत्सवात उद्या काय पाहाल?

23 एप्रिलला दुपारी 12 वाजता सिने पत्रकारांसाठी खास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत गणेश मतकरी, हरी मृदुल, श्रीकांत बोजेवार हे सिने पत्रकार-अभ्यासक सहभागी होणार असून डॉ. संतोष पाठारे समन्वयक आहेत.

दुपारी 3 वाजता ‘भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांचे स्थान’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात अशोक राणे, नितीन वैद्य, गजेंद्र अहिरे, मृणाल कुलकर्णी आदी कलाकार सहभागी होणार आहेत, तर मनीषा कोरडे संवादक आहेत.

Sangli Politics : सांगलीत राष्ट्रवादीची ताकद वाढली, चार माजी आमदारांचा अजितदादांच्या पक्षात प्रवेश

संध्याकाळी 6 वाजता ‘मराठी चित्रपटाचे प्रसारण, प्रसिध्दी व वितरण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यात नानुभाई जयसिंघानी (निर्माते), सादिक चितळीकर (वितरक), रोहन मापुस्कर (दिग्दर्शक), दिग्पाल लांजकेर(दिग्दर्शक), श्रीकांत भिडे (दिग्दर्शक), गणेश गारगोटे (प्रसिध्दी) सहभागी होणार आहेत, तर संवादकाची जबाबदारी अमित भंडारी यांच्यावर आहे.

follow us