Download App

Oscar 2023 : भारताला दोन ऑस्कर पण ऑस्कर पुरस्कारांचा इतिहास काय आहे? पुरस्कारांची निवड कशी होते?

  • Written By: Last Updated:

आज सकाळी 95 व्या ऑस्कर (Oscar Awards) समारंभात या पुरस्काराची घोषणा झाली. यामध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कार्तिकी गोन्सालवेस आणि गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ (The Elephant Whisperers) या डॉक्युमेंट्रीला यंदाच्या ऑस्कर्समध्ये बेस्ट डॉक्युमेंट्री ऑन शॉर्ट सब्जेक्ट हा पुरस्कार मिळाला आहे. या कॅटेगरीत पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय फिल्म ठरली. ही डॉक्युमेंट्री मदुमलाई अभयारण्यातल्या रघू नावाच्या एका अनाथ हत्तीच्या पिल्लाची गोष्ट सांगते.

यासोबतच या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला, कारण RRR या चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ (Natu Natu) या गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल साँग’चा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. भारतीय प्रोडक्शनमध्ये बनलेलं हे पहिलं गाण आहे ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सकाळपासून ऑस्करचीच चर्चा आहे.

हेही वाचा :  Oscars 2023 : मोदी, राहुल गांधी ते फडणवीस; ऑस्कर मिळाल्यानंतर कोण काय म्हणालं?

ऑस्कर पुरस्कारांचा इतिहास

ऑस्कर अवॉर्ड म्हणजे ऑस्कर अकादमी पुरस्कार हा चित्रपट जगतातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. अमेरिकेतील अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस तर्फे चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, लेखक यांसारख्या चित्रपट जगताशी संबंधित व्यावसायिकांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात 1927 मध्ये त्या काळातील मोशन पिक्चर्स इंडस्ट्रीतील 36 नामवंत व्यक्तींनी सुरू केली होती.

1927 च्या सुरुवातीस MGM स्टुडिओचे प्रमुख लुई बी. मेयर आणि त्यांच्या तीन मित्रांनी संपूर्ण चित्रपट उद्योगासाठी एक संस्था स्थापन करण्याचा प्लॅन केला. तो प्लॅन त्यांनी त्यावेळच्या काही प्रमुख लोकांसमोर मांडला. 11 जानेवारी 1927 रोजी लॉस एंजेलिस मधील एका हॉटेलमध्ये डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले. त्यात 36 जणांनी सहभाग घेतला. त्या सर्वानी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्याच वर्षी संस्था म्हणून त्याची सुरवात झाली. सुरुवातीला 230 जणांनी $100 फी भरून अकादमीचे सदस्यत्व घेतले होते. आणखी एक म्हणजे त्यावेळी जगप्रसिद्ध थॉमस एडिसन यांना अकादमीचे पहिले मानद सदस्यत्व देण्यात आले होते.

पहिला ऑस्कर पुरस्कार कधी दिला गेला?

1929 साली पहिले ऑस्कर पुरस्कार देण्यात आले. हॉलीवूड रुझवेल्ट हॉटेलमध्ये पहिला अकादमी पुरस्कार सोहळा पार पडला. त्याला फक्त 270 लोक उपस्थित होते आणि त्यावेळी सशुल्क कार्यक्रम होता ज्याची तिकीट किंमत 5 डॉलर इतकी होती. 1929 मध्ये दिलेले हे पुरस्कार 1927 आणि 1928 मध्ये बनलेल्या चित्रपटांशी संबंधित 15 लोकांना देण्यात आले होते. पण आज फ्रंटपेज न्यूज असलेल्या ऑस्करच्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याला मीडिया उपस्थित नव्हता.

हेही वाचा : Oscar 2023 Natu Natu : ‘नाटू-नाटू’ ऑस्करविजेता बनवण्यामागे आहे ‘या’ व्यक्तीचा हात

कोणत्या चित्रपटांचा पुरस्कारासाठी विचार केला जातो?

ऑस्करच्या अधिकृत वेबसाइटनुसार खालील अटींची पूर्तता करणाऱ्या चित्रपटांचा विचार केला जातो

अमेरिकेच्या सहा मेट्रोपॉलिटन क्षेत्रांपैकी किमान एकामध्ये व्यावसायिक सिनेमांमध्ये दाखवण्यात आलेला असावा
चित्रपट 40 मिनिटांपेक्षा मोठा असावा.
चित्रपट त्या वर्षाच्या 1 जानेवारी ते 31 डिसेंबर दरम्यान प्रदर्शित झाला असावा
चित्रपट एकाच थिएटरमध्ये सलग 7 दिवस चालला असावा.

ऑस्करसाठी चित्रपट कसे पाठवले जातात?

ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट अशी एक श्रेणी आहे. या श्रेणीत ऑस्कर अकादमी जगभरातील चित्रपटांना आमंत्रित करते. दरवर्षी आपल्या देशातील चित्रपटही ऑस्करसाठी पाठवले जातात. ऑस्कर पुरस्कारांसाठी भारतातील चित्रपटांची निवड करण्याची जबाबदारी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाची आहे. गेल्या वर्षभरात देशातील कोणत्याही सिनेमागृहात प्रदर्शित झालेला चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जाऊ शकतो. यासोबतच हा चित्रपट देशातील कोणत्याही अधिकृत भाषेत असला तरी त्याची सबटायटल्स इंग्रजीत असली पाहिजेत. या अटींची पूर्तता करणाऱ्या चित्रपटालाच ऑस्कर एंट्री म्हणून देशातून पाठवले जाते.

पुरस्कारासाठी मतदान कसे होते?

अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसची स्वतःची 6000 सदस्यांची रिसर्च टीम आहे. यात अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माते, लेखक, डिझाइनर, सिनेमॅटोग्राफर, फिल्म एडिटर, मेकअप आर्टिस्ट, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि इतर काही प्रकारच्या लोकांचा समावेश आहे.

हे सगळे लोक प्रत्येक पॅरामीटरवर तपासून चित्रपटांचे नामांकन ठरवतात. चित्रपटाच्या निर्मात्यांना जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी या सर्व सदस्यांना त्यांचे चित्रपट दाखवावा लागतो. त्यासाठी चित्रपटाचे स्क्रिनिंग केले जाते. ऑस्करच्या स्क्रिनिंगसोबतच मतदारांसाठी विविध खर्च आणि थिएटर, नाश्ता आणि इतर बराच सोयीसाठी खर्च करावा लागतो. जेणेकरून चित्रपटाला चांगली प्रसिद्धी मिळून तो मतदारांच्या नजरेत येऊ शकेल.

Tags

follow us