Rinku Rajguru : महिलांचा निर्भय आवाज, 19 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘आशा’
Rinku Rajguru : ''बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये'' अशा प्रभावी टॅगलाईनसह येणाऱ्या ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून
Rinku Rajguru : ”बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये” अशा प्रभावी टॅगलाईनसह येणाऱ्या ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 19 डिसेंबरला ‘आशा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपली ताकद सिद्ध केली आहे. 61 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत ‘आशा’ने समीक्षकांची दाद मिळवली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका साकारत आहे रिंकू राजगुरू. या व्यक्तिरिक्त या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
रिंकूने (Rinku Rajguru) साकारलेली ‘आशा’ ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज आहे. तिच्या डोळ्यांतून दिसणारा संघर्ष, तिच्या पावलांतून जाणवणारी जबाबदारी आणि संकटांचा सामना करताना न हरता उभी राहणारी ताकद आहे. या सर्वांमुळे ही भूमिका चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात, ” ‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाहीये तर घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आहे. सतत नवनवीन विषयांना उचलून धरणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही वेगळ्या वाटेवरची वेगळी आणि अनोखी गोष्ट निश्चितच आवडेल, अशी खात्री आहे.’’
दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर चटवानी आणि रवींद्र अवटी सहनिर्माते आहेत.
पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट नाविन्यपूर्ण कथा घेऊन येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना कधीही न पाहिलेल्या दुनियेचं दर्शन घडवणारं आहे.
