Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan :
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सध्या राज्यभर आंदोलनाचे लोण पेटले आहे. अनेक ठिकाणी रस्ता-रोको, दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. शिवाय ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याच सामाजिक अस्थिरतेचा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला फटका बसला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने पाच नोव्हेंबर रोजी सांगलीत होणारा संमेलनाच्या मुहूर्त मेढीचा कार्यक्रम रद्द केला आहे. सोबतच नाट्य संमेलनाचे स्वागताध्य, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांनीही राजीनामा दिला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून होणार, होणार म्हणून 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची चर्चा होती. यापूर्वी कोरोना आणि अन्य कारणांमुळे हे नाट्य संमेलन लांबणीवर पडले होते. आता या संमेलनाची मुहूर्तमेढ येत्या रविवारी सांगलीत रोवण्यात येणार होती. यानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार होते. मात्र राज्यभर उसळलेल्या मराठा आंदोलनामुळे हे सर्व कार्यक्रम तूर्त लांबणीवर टाकण्याचा निर्णय मध्यवर्ती संयोजन समितीने घेतला आहे.
विष्णुदास भावे नाट्यविद्यामंदिरच्या प्रांगणात आज (2 नोव्हेंबर) सकाळी संमेलनाच्या मंडप उभारणीचा मुहूर्त होता. तर मराठी रंगभूमीदिनी (5 नोव्हेंबर) राज्यव्यापी 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन विभागीय स्तरावर होणार होते. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते झाडाची फांदी लावून मुहूर्तमेढ रोवण्यात येणार होती. त्यानंतर अध्यक्षांसह काही सदस्यांची भाषणे आणि पुढील कार्यक्रमांची आखणी होणार होती. परंतु एकूण वातावरण पाहता हा सोहळा पुढे ढकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर सुरू झाला. आंदोलनाची धग राज्यभर असल्याने संमेलनाचा प्रारंभ करणे उचित नसल्याची भूमिका संयोजकांनी मांडली. त्यानंतर अंतिम निर्णय झाला.
दरम्यान, आमदार सुधीर गाडगीळ यांनीही संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. समाजमाध्यमांवरून त्यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. राज्य सरकार टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अशा परिस्थितीत स्वागतध्यपद भूषवणे योग्य वाटत नाही. मराठा बांधवासमवेतच आहे.