Mrudgandh Award 2026: ठाणे : “पुरस्काराने मन आनंदित होते, नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. अशा वेळी गुरूंची आठवण येणे स्वाभाविक आहे. गुरुकृपेशिवाय साधनेला अर्थ नाही आणि संगीत क्षेत्रात गुरूंचे स्थान अनन्यसाधारण आहे. शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला हे संगीताचे चार महत्त्वाचे स्तंभ आहेत. शास्त्र समजावले जाते, तंत्र शिकवले जाते, विद्या दिली जाते; मात्र कला संस्कारित करते. संगीताचे ज्ञान बाहेरून आत येत नाही, तर ते अनुभूतीतून आत्मसात होते.
वेगवेगळ्या अनुभवांतून ज्ञान प्राप्त होते आणि हे ज्ञान नेहमी आतून बाहेर प्रवाहित होते. अनुभूती साधनेशिवाय, साधना संस्कारांशिवाय आणि संस्कार गुरूंशिवाय शक्य नाहीत,” असे सांगत भारतीय शास्त्रीय संगीताच्या अभिजात परंपरेतील गुरूंचे महत्त्व पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी अधोरेखित केले. 16व्या लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहात आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या ‘मृदगंध पुरस्कार 2026’ सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे 16वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचा प्रतिष्ठित ‘मृदगंध पुरस्कार 2026’ सोहळा उत्साहात पार पडला. खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेले आकर्षक मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
लोककलेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे संगीत नाटक अकादमी आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘मृदगंध पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते.
यंदाच्या ‘मृदगंध पुरस्कार 2026’ मध्ये लोककला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा, छायाचित्रण आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री सुधाकर ओलवे, अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रासाठी संदेश कुलकर्णी, अभिनय क्षेत्रासाठी अभिनेत्री अमृता सुभाष, तर नवोन्मेष प्रतिभा विभागात गायक चैतन्य देवढे (माऊली) यांना सन्मानित करण्यात आले.
“मला आणि संदेशला एकत्रितपणे मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. आज हा पुरस्कार स्वीकारताना बाबांची खूप आठवण येतेय. विठ्ठल उमप यांच्या सच्च्या सुरांतून, त्यांच्या कामातून आणि आठवणींतून आजही आम्ही खूप काही शिकत आहोत. त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळणे, ही भावना शब्दांत व्यक्त करणे खरंच कठीण आहे. हा पुरस्कार आमच्यासाठी खूप खास आहे,” अशा भावना अभिनेत्री अमृता सुभाष यांनी व्यक्त केल्या.
संदेश कुलकर्णी म्हणाले, “हा प्रेमाचा सोहळा असून यात सहभागी होता आले, याचा खूप आनंद आहे. उत्तम कलाकारांसोबत पुरस्कार स्वीकारण्याची आणि या सुंदर सोहळ्याचा भाग होण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. हा पुरस्कार पुढील प्रवासात आणखी चांगले काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल.”
गायक चैतन्य देवढे (माऊली) यांनी पुरस्कार स्वीकारताना विठ्ठलाचा आशीर्वाद लाभल्याची भावना व्यक्त केली. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पुरस्कारामुळे आनंद आणि नवी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार लाखमोलाचा असल्याची भावना सर्व पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली.
सोहळ्यात प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे, अरुण पेदे वेसावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बहारदार कलाविष्कार सादर करत लोकशाहीर विठ्ठल उमप यांना सांगीतिक मानवंदना अर्पण केली.
जितेंद्र कुमार-प्रिया बापट यांची प्रमुख भूमिका, सायकोलॉजिकल थ्रिलर “डाळिंब” ‘या’ प्रदर्शित होणार!
“बाबांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांचा वारसा पुढे नेताना आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. आजवर 65 मान्यवरांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली. या मान्यवरांचा सन्मान करताना आम्हालाही सन्मानित झाल्यासारखे वाटते,” अशी भावना प्रसिद्ध गायक आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवर आणि रसिकांचे आभार मानले. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
लोककलेचा गौरव, मान्यवरांचा सन्मान आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतींना सांगीतिक मानवंदना देणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.
