IFFI मध्ये ‘तू आहेस ना’चा दिमाखदार प्रीमियर; सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडकेच्या अभिनयाने प्रेक्षक भारावले!
IFFI 2026 Tu Ahes Na Movie ;IFFI प्रीमियरमध्ये चित्रपटाच्या भावनिक कथेला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.
IFFI 2026 Tu Ahes Na Movie: लव्ह फिल्म्सचा दुसरा मराठी चित्रपट ‘तू आहेस ना’ याला गोव्यात सुरू असलेल्या 57व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये झालेल्या गाला प्रीमियरदरम्यान प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. ऑडिटोरियममध्ये झालेल्या या स्क्रीनिंगला 450 हून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. भावनिक प्रसंग, प्रेक्षकांकडून मिळालेलं कौतुक आणि टाळ्यांचा कडकडाट यामुळे ही संध्याकाळ अविस्मरणीय ठरली.
Rohit Sharma : रोहितच्या कॅप्टसीची घोषणा 5:45 च्या मुहूर्तावर का? खास आहे कारण…
या स्क्रीनिंगदरम्यान चित्रपटातील मुख्य कलाकार सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) आणि सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) यांच्यासह लेखक-दिग्दर्शक दीपक गावडे आणि निर्माते अंकुर गर्ग यांनीही आपली उपस्थिती दर्शवली.
चित्रपटाची कथा जसजशी पडद्यावर उलगडत गेली, तसतसे ती प्रेक्षकांशी एक भावनिक नाते जोडत गेली. चित्रपटाची कथा, त्यातील व्यक्तिरेखा आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप पाडली. चित्रपटातील भावनिक प्रसंगांचा प्रभाव संपूर्ण भरलेल्या ऑडिटोरियममध्ये अनेकदा अनुभवायला मिळाला. सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी मनापासून कौतुक केले. कलाकारांनी केवळ आपल्या व्यक्तिरेखा साकारल्या नाहीत, तर त्या प्रत्यक्ष जगल्या आहेत, हे त्यांच्या अभिनयातून जाणवत होते. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणात सहजता, संवेदनशीलता आणि प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची जाणीव प्रकर्षाने जाणवली.
या अनुभवाबद्दल बोलताना अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, “माझ्या मते, IFFI मध्ये चित्रपटाची निवड होणे ही तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची एक उत्तम संधी आहे. या चित्रपटाच्या कथेशी मी एका वैयक्तिक अनुभवामुळे जोडले जाऊ शकले आणि हीच या चित्रपटाचा भाग होण्यामागील माझी सर्वात मोठी कारणांपैकी एक होती. हिंदी सिनेमातील दोन मोठे निर्माते लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग यांनी मराठीत अशा संवेदनशील कथेची साथ देण्याचा निर्णय घेतला, यामुळेही मला प्रोत्साहन मिळाले. दीपक यांची कथा सांगण्याची पद्धत, पटकथेची ताकद आणि कथेवर असलेला त्यांचा विश्वास यामुळे मला या चित्रपटाशी जोडले जाण्याचे बळ मिळाले.”
यापुढे सिद्धार्थ म्हणाले, “स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आपण नेमके कशा प्रकारची व्यक्ती बनतो, हा एक महत्त्वाचा प्रश्न हा चित्रपट उपस्थित करतो. हा संपूर्ण प्रवास अतिशय सुंदर राहिला आहे आणि ‘तू आहेस ना’चा प्रीमियर IFFI मध्ये झाला, याचा मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे, मी पहिल्यांदाच येथे आलो आहे. या संधीसाठी मी लव्ह सर, अंकुर आणि दीपक यांचा मनापासून आभारी आहे. सुप्रिया ताईंसोबत काम करणे आणि त्यांच्यासोबत पडद्यावर इतक्या साऱ्या भावना साकारण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता. मी लहानपणापासूनच त्यांच्या कामाचा चाहता आहे.”
या खास प्रसंगी संध्याकाळ आणखी अविस्मरणीय ठरली, कारण सिद्धार्थचे कुटुंबीयही या सोहळ्याला उपस्थित होते. चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरचे साक्षीदार होण्याचा हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठीही कायम स्मरणात राहणारा ठरला.
IFFI मध्ये मराठी चित्रपट ‘तू आहेस ना’च्या विशेष वर्ल्ड प्रीमियरला मिळालेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, खचाखच भरलेले ऑडिटोरियम, प्रेक्षकांच्या भावनिक प्रतिक्रिया आणि सर्वत्र घुमणारा टाळ्यांचा कडकडाट यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी हा सोहळा अत्यंत खास ठरला.
लव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दीपक गावडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग आहेत. हा चित्रपट 2027 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.