Official announcement of the movie ‘Gajra’ : मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच आशयघन आणि नवनवीन प्रयोगांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. याच परंपरेला पुढे नेण्यासाठी ‘झिगझॅग प्रॉडक्शन’ आणि ‘गणराज स्टुडिओज’ यांनी आपल्या आगामी भव्य मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘गजरा’ असे या चित्रपटाचे नाव असून, नुकतेच या चित्रपटाचे अत्यंत उत्कंठावर्धक आणि अंगावर काटा आणणारे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणारी केरला स्टोरी सिनेमा ची स्टार आणि आघाडीची अभिनेत्री अदा शर्मा या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत आपले पदार्पण करत आहे.
ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अदा शर्माचा अत्यंत रौद्र, भीतीदायक आणि रक्ताने माखलेला चेहरा पाहायला मिळत आहे. तिच्या डोळ्यांमधील तीव्र भाव, कपाळावर लावलेले कुंकू आणि नाकातील पारंपरिक नथ हा लूक लक्षवेधी ठरत आहे. पोस्टरवरील तिची ही झलक पाहाता, हा चित्रपट एक अत्यंत प्रभावी चित्रपट असेल असे नक्कीच म्हणता येईल. ‘गजरा’ हा चित्रपट समाजातल्या सत्य घटनांवर आधारित असून एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर प्रकाश टाकणारा आहे.
‘बंडखोरांना तुडवा’ संजय राऊतांच्या विधानानंतर 6 खासदारांना Y+ सुरक्षा
या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्रेयस जाधव करत आहेत. आपल्या वेगळ्या दिग्दर्शन शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रेयस जाधव यांचा हा चौथा चित्रपट प्रेक्षकांना एक नवा अनुभव देईल यात शंका नाही. तसेच या चित्रपटाची निर्मिती अमोल बोरकर यांनी केली आहे. या चित्रपटाची घोषणा करताना दिग्दर्शक श्रेयस जाधव म्हणाले, “जेव्हा ‘गजरा’ या चित्रपटाची मूळ संकल्पना आणि यामागील सत्य घटना माझ्यासमोर अमोल बोरकर जी यांनी आणली , तेव्हाच मला जाणीव झाली होती की हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसेल, तर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरेल. ही एक अतिशय तीव्र, संवेदनशील आणि अंगावर काटा आणणारी कथा असेल सध्या एवढेच सांगेल.
ठाकरे गटातील बंडखोरांचा ‘कॅप्टन’ ठरला?; परभणीचे ‘बंडू बॉस’ करणार फुटलेल्या खासदारांचे नेतृत्त्व
या भूमिकेसाठी आम्हाला एका अशा चेहऱ्याची गरज होती जो निरागसता आणि तितकाच रौद्र अवतार एकाच वेळी पडद्यावर जिवंत करू शकेल; आणि अदा शर्मापेक्षा उत्तम पर्याय दुसरा असूच शकत नव्हता असे मी आणि अमोल जी यांनी ठरवले. पोस्टरमध्ये तिची जी झलक दिसत आहे, ती तर फक्त एक सुरुवात आहे. चित्रपटात तिचा एक वेगळाच अभिनय पॅटर्न प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा भव्य थरारपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आणि शूटिंग ला सुरवात करण्या साठी मी प्रचंड उत्सुक आहे.”
चित्रपटाच्या संगीताची धुरा सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार देवदत्त मनीषा बाजी सांभाळली असून त्यांचे संगीत या चित्रपटाला नक्कीच एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे ठरेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नेमकी तारीख ठरली नसली तरी हा भव्य मराठी चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अदा शर्माचा हा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
