ठाकरे गटातील बंडखोरांचा ‘कॅप्टन’ ठरला?; परभणीचे ‘बंडू बॉस’ करणार फुटलेल्या खासदारांचे नेतृत्त्व

Sanjay Jadhav विधान परिषदेचं मतदान संपल्यानंतर उद्धव सेनेच्या सहा फुटलेल्या खासदारांचा गट स्थापन करण्यात येऊन त्याचा गटनेता ठरवला जाईल.

  • Written By: Published:
Sanjay Jadhav

UBT Rebel MPs Update : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांच्या बंडानंतर आता या नव्या गटाचा चेहरा आणि नेतृत्व कोणाकडे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्व चर्चांमध्ये परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांचे नाव आघाडीवर आले असून, फुटलेल्या खासदारांच्या गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गटाने सर्व नऊ खासदारांची बैठक बोलावून व्हिप जारी केला होता. मात्र सहा खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवत पक्षातील बंडावर शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता या नव्या राजकीय गटाचा ‘कॅप्टन’ कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Operation Tiger Live : ठाकरेंचे 6 खासदार फुटले; संसदीय बैठकीला दांडी मारून व्हिप उडवून लावला

‘बंडू बॉस’ ठरणार गटाचा प्रमुख चेहरा?

सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर फुटलेल्या सहा खासदारांचा स्वतंत्र गट अधिकृतपणे स्थापन केला जाऊ शकतो. या गटाचा नेता म्हणून संजय (बंडू) जाधव यांच्या नावावर जवळपास एकमत झाल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्यातील प्रभावी नेता आणि पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

देशमुख-आष्टीकरांच्या नावाची चर्चा मागे

या घडामोडींपूर्वी वाशिम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख हे गटाचे कॅप्टन, तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे व्हाईस कॅप्टन असतील, असा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. मात्र आता राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतल्याचे दिसत असून नेतृत्वाची धुरा बंडू जाधव यांच्या हाती जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

नाराजी हेरली, ठाकरे बेसावध असतानाच दिल्लीला रवाना; संजय जाधव अन् संजय देशमुख शिंदेंच्या गळाला कसे लागले?

मराठवाड्यातून नवा पॉवर सेंटर?

सहा खासदारांच्या या गटात मराठवाड्यातील नेत्यांचे वर्चस्व असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत संजय जाधव यांच्याकडे नेतृत्व दिल्यास गटाला एकसंघ ठेवणे आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी स्पष्ट दिशा देणे सोपे जाईल, असे या निर्णयामागील प्रमुख कारण मानले जात आहे.

ठाकरे गटासाठी आणखी मोठा धक्का?

सहा खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर ठाकरे गटासमोरील आव्हाने आणखी वाढली आहेत. आता या बंडखोर गटाला अधिकृत स्वरूप मिळते का आणि ‘बंडू बॉस’ म्हणून संजय जाधव यांची घोषणा होते का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण हा निर्णय केवळ गटनेता निवडण्यापुरता मर्यादित नसून, ठाकरे शिवसेनेतील पुढील राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारा ठरू शकतो.

follow us