मतदार यादीत तब्बल 96 लाख बोगस मतदार! राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. राज्यातील मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदारांची भर घालण्यात आली, असा आरोप केला.

Raj Thackeray News

Raj Thackeray News

Raj Thackeray Criticize Election Commission : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला. राज्यातील मतदार याद्यांमध्ये तब्बल 96 लाख बोगस मतदारांची भर घालण्यात आली, असा गंभीर आरोप केला आहे. ते रविवारी मुंबईतील नेस्को मैदानावर झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

खोट्या नावांची नोंद

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दावा केला की, 1 जुलै रोजी निवडणूक आयोगाने (Election Commission) मतदार यादी गोठवली होती. पण त्यानंतर खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात 96 लाख खोटे मतदार नोंदवले गेले. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या प्रमुख शहरांमध्येच तब्बल आठ ते साडेआठ लाख खोट्या नावांची नोंद झाली आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप करताना म्हटलं की, आम्हाला नेहमी सांगितलं जातं की, राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाहीत. पण निवडणुकीच्या याद्यांमध्येच जर गणित सेट केलं असेल, तर आमचे आमदार-खासदार कसे निवडून येणार? मतदार यादीच बनावट (Fake Voters) असेल, तर लोकशाहीचा अर्थ उरत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राग येतोय म्हणजे …

राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत निवडणूक आयोगावर टीका करत म्हटलं, सत्ताधाऱ्यांकडूनच (Maharashtra Politics) मतदार यादीत फेरफार करून लोकशाहीला पायदळी तुडवलं जात आहे. आम्ही यावर बोललो की, सत्ताधाऱ्यांना राग येतो. पण राग येतोय म्हणजे काहीतरी दडलेलं आहे, हेच खरं. मनसेप्रमुखांनी महायुती सरकारवरही घणाघाती हल्ला चढवला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून आले, तरीही राज्यभर सन्नाटा होता. कुठेही जल्लोष दिसला नाही, कारण लोकांनाच विश्वास बसत नव्हता की, हे निकाल खरे कसे? असा टोला ठाकरेंनी लगावला.

गुजरातचा वरवंटा

राज ठाकरे पुढे म्हणाले, जोपर्यंत राज्यातील मतदार याद्या शुद्ध केल्या जात नाहीत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवा. अन्यथा या बोगस मतदारांवरच निवडणुका घेतल्या जातील आणि स्थानिक पक्ष संपवले जातील. भाजपला मतं देणारे मराठी लोक आहेत. पण हा ‘गुजरातचा वरवंटा’ महाराष्ट्रावर उलटेल तेव्हा तुम्हालाही त्याच्या खाली घेतले जाईल, असे ते म्हणाले.

अदानीसारख्या उद्योगपतींच्या घशात

त्यांनी पुढे बुलेट ट्रेन, नवी मुंबई विमानतळ आणि कोस्टल रोड प्रकल्पांवरूनही सरकारवर टीका केली. हे प्रकल्प मराठी माणसाच्या थडग्यावर उभे राहून होत आहेत. प्रगतीच्या नावाखाली आदिवासींना हटवले जात आहे, जमिनी अदानीसारख्या उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहेत. केंद्र, राज्य आणि आता स्थानिक सत्ता एकाच हातात आली की, महाराष्ट्राचे रान मोकळे होईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

Exit mobile version