Rohini Hattangadi : मराठी रंगभूमीवर माय–लेकीचं नातं अत्यंत संवेदनशीलतेनं मांडणाऱ्या गाजलेल्या ‘चारचौघी’ या नाटकातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे या दोन दिग्गज अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. यावेळी त्या रंगभूमीवर नव्हे, तर मोठ्या पडद्यावर ‘माया’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
‘चारचौघी’ सारख्या स्त्रीप्रधान नाटकानंतर आता ‘माया’ या चित्रपटातही या दोघी स्वतंत्र विचारांच्या, स्वाभिमानी आणि आत्मभान असलेल्या स्त्री व्यक्तिरेखा साकारणार आहेत. अनुभव आणि अभिनयातील परिपक्वतेचा संगम असलेली ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणारी ठरत आहे.
रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय म्हणजे सूक्ष्मतेतून मोठे भाव उलगडणारी प्रक्रिया, तर मुक्ता बर्वे ही आधुनिक स्त्रीचं सशक्त प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ‘माया’ मध्ये त्यांचा केवळ अभिनय नाही तर, स्त्रीमनाच्या विविध छटांची प्रगल्भ मांडणी पाहायला मिळणार आहे.
रोहिणी हट्टंगडी म्हणतात, ”मुक्तासोबत पुन्हा काम करणं हा एक अत्यंत समाधान देणारा अनुभव आहे. ती एक संवेदनशील, विचारशील आणि स्वतःच्या अभिनयाबाबत प्रचंड प्रामाणिक अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना समोरची व्यक्तिरेखा अधिक सखोल होते. अभिनय म्हणजे केवळ संवाद बोलणं नसून, तो जगण्याचा अनुभव असतो आणि मुक्ताकडे तो अनुभव मनापासून स्वीकारण्याची क्षमता आहे. तिच्यासोबतचा प्रत्येक सीन मला अभिनेत्री म्हणून अधिक समृद्ध करून जातो.”
मुक्ता बर्वे आपल्या अनुभवाबद्दल बोलते, ”रोहिणी ताईंसोबत पुन्हा काम करणं, ही माझ्यासाठी शिकण्याचीच एक प्रक्रिया आहे. त्यांच्या अनुभवातून येणारी शांतता, प्रसंग समजून घेण्याची दृष्टी आणि अभिनयातील प्रगल्भता सतत प्रेरणा देते.
सेटवर त्यांच्यासोबत असताना अभिनय सहज घडतो. त्यांनी आयुष्य आणि अभिनय दोन्ही खूप खोलवर अनुभवलं आहे आणि ते त्यांच्या प्रत्येक भूमिकेत दिसून येतं. अशा कलाकारासोबत काम करणं हे खरं तर भाग्य आहे.”
शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित ‘माया’ या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर आणि विजय केंकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलिसाकडून नको ते घडलं अन्…, मोठी दुर्घटना टळली
येत्या 27 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘माया’ हा चित्रपट त्याच्या पोस्टरमुळे आधीच चर्चेत असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी, स्त्रीमनाच्या स्वातंत्र्याची आणि आत्मशोधाची ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
