Sakal Tar Hodo Dya : काही चित्रपट आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे घोषणेपासूनच चर्चेचा विषय ठरतात. यात चित्रपटाचे शीर्षक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. असेच अनोखे शीर्षक असलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ (Sakal Tar Hodo Dya) हा मराठी चित्रपट सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) चित्रीकरण करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली आहे. ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट 10 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
श्रेय पिक्चर कंपनीच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाची निर्मिती नम्रता सिन्हा (Namrata Sinha) यांनी केली आहे. नम्रता सिन्हा यांनी आजवर अनेक लोकप्रिय टीव्ही मालिका आणि वेबसीरिजची निर्मिती केली आहे. तसेच, त्या सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते विनय सिन्हा यांच्या कन्या आहेत. ज्यांनी ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘नसीब’ यांसारख्या अनेक अजरामर हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता नम्रता सिन्हा यांनी ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. आजवर हिंदीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या आलोक जैन यांनी ‘सकाळ तर होऊ द्या’चे लेखन व दिग्दर्शन केले आहे. जगण्याचा मंत्र देणाऱ्या या चित्रपटात सुबोध भावे (Subodh Bhave) आणि मानसी नाईक (Mansi Naik) मुख्य भूमिकेत आहेत. अतिशय वेगळ्या जॅानरच्या या चित्रपटात सुबोध आणि मानसी आजवर कधीही न दिसलेल्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच ‘सकाळ तर होऊ द्या’ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वास्तव परिस्थितीला सामोरे जात, तसेच असंख्य अडचणींवर मात करत जगण्याला नवी दिशा देणारी कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
या चित्रपटाबाबत दिग्दर्शक आलोक जैन म्हणाले की, दोन व्यक्तिरेखांच्या बळावर प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवण्याची किमया या चित्रपटात पाहायला मिळेल. हा केवळ मनोरंजक चित्रपट नसून जगण्याचे कटू सत्य सांगणारा आहे. समाजापर्यंत महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवणारा आहे. चित्रपट पाहताना प्रत्येकाला तो आपलासा वाटेल. दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे ‘सकाळा तर होऊ द्या’च्या रूपात एक दर्जेदार चित्रपट बनवण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण टिमने केला असून, निर्मात्यांनी मोकळीक दिल्याने मनाजोगता सिनेमा बनवण्याचे समाधान लाभल्याचेही जैन म्हणाले.
सनी देओल अन् एक्सेल एंटरटेनमेंट अॅक्शन थ्रिलरसाठी पहिल्यांदाच एकत्र; डिसेंबरपासून शूटिंगला सुरुवात
हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमिया यांची हिमेश रेशमिया मेलडीज या सिनेमातील गाणी रसिकांच्या भेटीला आणणार आहे. गीतकार अभिषेक खणकर यांनी लिहिलेली ‘सकाळ तर होऊ द्या’मधील गाणी संगीतकार रोहित राऊत यांनी संगीतबद्ध केली आहेत. सारेगमप लिटिल चॅम्प्सद्वारे नावारूपाला आलेल्या गायक-संगीतकार रोहितने आजवर बरीच लोकप्रिय गाणी गायली असून, त्याच्या सुमधूर संगीतरचनांनी रसिकांच्या मनावर गारूड केले आहे. चित्रपटातील संवादलेखन ओंकार बर्वे आणि अंकुश मरोडे यांनी केले असून छायांकनाची जबाबदारी सुनील पटेल यांनी सांभाळली आहे. सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरण करणार आहे.