सनी देओल अन् एक्सेल एंटरटेनमेंट अॅक्शन थ्रिलरसाठी पहिल्यांदाच एकत्र; डिसेंबरपासून शूटिंगला सुरुवात

Sunny Deol : ‘गदर 2’ आणि ‘जाट’ या सलग दोन यशस्वी चित्रपटांनंतर सनी देओल आता हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात विश्वासार्ह अभिनेत्यांपैकी एक मानले जात आहेत. 2025 मध्ये त्यांच्याकडे ‘बॉर्डर 2’, ‘लाहौर 1947’ आणि ‘रामायण: पार्ट वन’ यांसारख्या भव्य चित्रपटांची मालिका आहे आणि आता मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, सनी देओल (Sunny Deol) यांच्या आगामी चित्रपटांची यादी आणखी मोठी होत चालली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सनी देओल लवकरच पहिल्यांदाच एक्सेल एंटरटेनमेंटसोबत (Excel Entertainment) एका मोठ्या बजेटच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात झळकणार आहेत.
एका जवळच्या सूत्राने सांगितले, “ही अद्याप शीर्षक न दिलेली अॅक्शन थ्रिलर सनी देओल आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यातील पहिली भागीदारी असेल. दोघांमध्ये गेल्या काही काळापासून चर्चेचा क्रम सुरू होता आणि आता एका उच्च संकल्पनेवर आधारित, भव्य अॅक्शन चित्रपटासाठी दोघेही खूप उत्साहित आहेत. सनीना स्क्रिप्ट प्रचंड आवडली आहे आणि त्यांना फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद आहे.” या चित्रपटाचे दिग्दर्शन बालाजी करणार असून, हे त्यांचे दिग्दर्शनातील पहिले पाऊल असणार आहे. बालाजी यांनी याआधी अनेक यशस्वी तमिळ चित्रपटांमध्ये असिस्टंट आणि असोसिएट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. चित्रपटाची टीम सध्या भव्य स्क्रीन अनुभवासाठी तयारी करत आहे. सूत्र पुढे सांगतात, “ही एक जबरदस्त आणि प्रभावी फिल्म असेल, जिथे सनी देओल प्रेक्षकांना त्यांच्याच आवडत्या अॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहेत. एक्सेल एंटरटेनमेंटही या पहिल्या सहकार्याला संस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना थरारक ड्रामा आणि भावनांनी परिपूर्ण अनेक इंटेन्स क्षण अनुभवायला मिळणार आहेत.”
Video : भारत माझा मित्र, माझ्या विनंतीवरुन युद्ध थांबवलं, ट्रम्प यांचा पुन्हा दावा
चित्रपटातील इतर प्रमुख भूमिकांची निवड सध्या सुरू आहे आणि लवकरच या चित्रपटाचे अधिकृत शीर्षक व फर्स्ट लुक जाहीर केला जाणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटबद्दल बोलायचे झाल्यास, हे प्रोडक्शन हाऊस येत्या दोन वर्षांत ‘120 बहादुर’, ‘मिर्झापूर: द मूव्ही’ आणि सर्वाधिक अपेक्षित ‘डॉन 3’ यांसारख्या भव्य थिएट्रिकल चित्रपटांसह सज्ज आहे.