Kishore Kadam: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आल्यावर “आपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं”, असं एकनाथ शिंदे म्हणत असल्याचे बघायला मिळत आहे. बुधवारी ‘मराठा आरक्षण’ (Maratha Reservation) प्रकरणी राज्यस्तरीय बैठक झाल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या अगोदरचा हा व्हिडीओ असल्याचे बघायला मिळत आहे.
हे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर विरोधकांनी सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याची जोरदार टीका केल्याचे देखील बघायला मिळालं आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी देखील माध्यमांशी बोलत असताना खुलासा केला आहे. परंतु एकूणच या व्हिडीओ प्रकरणावर प्रसिद्ध कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांनी एक कविता लिहिली आहे.
लोकप्रिय कवी सौमित्र हे अभिनयासोबतच एक उत्तम कवी आणि लेखक म्हणून देखील ओळखले जातात. आपल्या कवितेच्या माध्यमांतून ते अनेकवेळा सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करत असताना बघायला मिळतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाल्यावर याविषयावार किशोर कदम यांनी कोणाचेही नाव न घेता एक कविता लिहिली आहे.
आपण बोलून निघून जायचं ..
होईल जनतेचं जे व्हायचं
आपल्याला काय..
आपण बोलुन निघुन जायचं…
आपल्याला काय..
केवढी जनता असते समोर
आपल्या जीवाला नस्ता घोर
सगळेच पक्ष लावतात जोर
कोण साधून् कोण चोर
आपली तशीच विचारधारा
जिकडे जसा वाहिल वारा
घालत राहायच्या येरझारा
जातोच निसटुन हातुन पारा
हेच लक्षण लक्षात ठेऊन
आपण येत जात ऱ्हायचं
तहाने सारखं व्याकुळ व्हायचं
जकडे झरा तिथलं प्यायचं
आपल्याला काय…
आपण पिउन निघुन जायचं
आपल्याला काय…
लोकांची पण सहनशक्ती
आपण ताणुन बघत नुस्ती
लाऊन द्यायची त्यांच्यात कुस्ती
कैसा गांव कैसी बस्ती
आपलेच सगळे कार्यकर्ते
आपले कर्ते आपले धर्ते
जिधर घुमाव उधर फिरते
त्यांच्या हातात काय उरते
उद्या परवा विचार करू
नंतर त्यांना काय द्यायचं
आधी बघू काय खायचं
लोकशाहीचंच गाणं गायचं
आपल्याला काय..
आपण गाउन निघुन जायचं
आपल्याला काय..
चोविस तास बातम्या मिळोत
चॅनल्स जाहिराती गिळोत
न्याय अन्यायाशी पिळोत
एफबी इन्स्टा सारे फळोत
खड्डे सगळे तसेच सडोत
निकाल लांबणीवरती पडोत
नशिबाशी कामं अडोत
नको तशा घटना घडोत
जे जे हवं ते ते द्यायचं
तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं
कशालाही नाही भ्यायचं
आपल्याला काय..
वचनं देउन निघुन जायचं
आपल्याला काय..
रोज लोकां समोर यायचं
रोज लोकां समोर जायचं
माईक बंद चालू असो
आपण फक्तं बोलत ऱ्हायचं
आपल्याला काय ..
सौमित्र.
Munna Bhai 3 चे शूटिंग सुरू? संजय दत्त-अरशद वारसीचा सेटवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
किशोर कदम यांनी या कवितेमध्ये माइकचा फोटो शेअर केला आहे. यावर अनेक चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “रोखठोक सौमित्रदा…साहित्यिक कसा असावा तर वास्तवाला धरून लगेच परखडपणे व्यक्त होणारा आणि तुमच्यासारखा ताठ मनक्याचा असावा…वाह” अशी कमेंट केली आहे. तर, दुसर्याने “वाह…माइक चालू आहे सर!”, ‘नेमकं पकडलंय’ अशा कमेंट्स सौमित्र यांच्या पोस्टवर होत असल्याचे बघायला मिळत आहेत.