Surya Ant Se Aarambh Tak intense teaser released Sunny Deol seen fighting against corruption in medical system : बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘सूर्या’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना खास भेट दिली आहे. चित्रपटाचा थरारक टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, यात सनी देओल एका दमदार आणि आजवर कधीही न पाहिलेल्या अंदाजात दिसत आहेत. त्यांचा हा नवा अवतार प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे.
चित्रपटाच्या मोशन पोस्टरला प्रेक्षक आणि सनी देओल यांच्या चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता टीझरच्या माध्यमातून निर्मात्यांनी चित्रपटाच्या कथाविश्वाची झलक दाखवली आहे. मोशन पोस्टरमधील सनी देओल यांचा रांगडा लूक, चेहऱ्यावर दिसणारे वयाचे ठसे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील संयम आणि नजरेतील तीक्ष्णता यांची आधीच चर्चा रंगली होती. आता टीझरमधून ‘सूर्या’ची कथा वरवर दिसते त्यापेक्षा अधिक खोल, गूढ आणि रहस्यमय असल्याचे स्पष्ट होते.
वैयक्तिक दुःखातून सुरू होतो सत्याच्या शोधाचा थरार!
एका वैयक्तिक दुःखातून आणि जवळच्या व्यक्तींना गमावल्याच्या वेदनेतून चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. भूतकाळातील जखमा मनात घेऊन जगणाऱ्या एका व्यक्तीची ही कथा आहे. मात्र, लवकरच सूर्या अशा घटनांच्या भयावह मालिकेत अडकतो, ज्यांचे धागेदोरे वैद्यकीय व्यवस्थेशी जोडलेले असतात.
बीडच्या नायगाव मयूर अभयारण्यात वाघाची एन्ट्री; खटकळी पाणवठ्याजवळ ट्रॅप कॅमेऱ्यात हालचाल कैद
सुरुवातीला ही केवळ वैयक्तिक स्वरूपाची घटना वाटते. परंतु, जसजशी कथा पुढे सरकते, तसतशी त्यामागे दडलेली मोठी कटकारस्थाने उघड होऊ लागतात. इतरांनी स्वीकारून मागे सोडून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा निर्णय सूर्या घेतो. वरकरणी कायदेशीर आणि व्यवस्थित वाटणाऱ्या व्यवस्थेच्या आड दडलेले भयावह सत्य समोर आणण्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो.
रितेश देशमुखचा तेलुगू सिनेमात ग्रँड डेब्यू; #RAPO23 च्या सेटवर जंगी स्वागत
हा चित्रपट ‘अविश्वसनीय सत्य घटनांपासून प्रेरित’ असल्याचे टीझरमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर, ‘आपल्या वैद्यकीय व्यवस्थेतील धक्कादायक सत्य’ उघड करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपटाची गंभीर आणि रहस्यमय कथा नेमकी कोणत्या दिशेने जाणार, याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
सनी देओल यांचा आजवरचा सर्वात वेगळा अंदाज!
‘सूर्या’ चित्रपटाच्या केंद्रस्थानी सनी देओल आहेत. त्यांचा नेहमीचा दमदार व्यक्तिमत्त्वाचा ठसा या भूमिकेतही दिसतो; मात्र यावेळी त्याला दुःख, भावनिक अस्वस्थता, शांतता आणि सत्य शोधण्याची धडपड यांची जोड मिळाली आहे. टीझरमध्ये भावनिक संघर्ष, महत्त्वाच्या पुराव्यांचा शोध आणि संघर्षाचे अनेक थरारक प्रसंग पाहायला मिळतात. कथा जसजशी पुढे जाते, तसतसा सनी देओल यांच्या ओळखीच्या अॅक्शनप्रधान अंदाजाची झलकही दिसू लागते. मात्र, यावेळी त्यांचा संघर्ष केवळ एखाद्या व्यक्तीविरुद्ध नसून संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध असणार आहे.
gokul-election-result-live गोकुळ कुणाचा ? महायुती 14, तर समविचारी आघाडी सहा जागांवर आघाडीवर
सनी देओल एका महत्त्वाच्या वैद्यकीय दस्तऐवजाची तपासणी करताना दिसतात. त्याचबरोबर रुग्णालयांतील अस्वस्थ करणारी दृश्ये, सिरिंज, हिंसक प्रसंग आणि वाढत जाणारा संघर्ष चित्रपटातील गूढ अधिक गडद करतात. टीझरमध्ये रवि किशन यांचीही दमदार झलक पाहायला मिळते. तर प्रज्ञा जायस्वाल यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटातील भावनिक आणि नाट्यमय पैलूंना अधिक विस्तार मिळतो.
दिग्दर्शक एम. पद्मकुमार काय म्हणाले?
चित्रपटाचे दिग्दर्शक एम. पद्मकुमार यांनी या चित्रपटाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,‘सूर्या’च्या माध्यमातून सनी सरांचा असा पैलू प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, जो त्यांनी यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. त्यांची व्यक्तिरेखा भूतकाळातील खोल वेदना मनात घेऊन जगते. मात्र, हेच दुःख त्यांना सत्याच्या शोधात पुढे जाण्याची ताकद देते.
टीझरची सुरुवात एका अत्यंत वैयक्तिक घटनेने होते. त्यानंतर कथा हळूहळू वैद्यकीय व्यवस्थेत दडलेल्या एका मोठ्या आणि अस्वस्थ करणाऱ्या वास्तवाकडे घेऊन जाते. सनी सरांनी या भूमिकेत प्रचंड संयम, संवेदनशीलता आणि तीव्रता दाखवली आहे. अॅक्शन आणि संघर्ष हे चित्रपटाचे महत्त्वाचे भाग आहेत. मात्र, ‘सूर्या’ची खरी ताकद या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीमध्ये आहे. प्रश्न विचारणं थांबवायला तयार नसलेला हा माणूसच चित्रपटाचा आत्मा आहे.”
‘अंत से आरंभ तक’ या शीर्षकाचा नेमका अर्थ काय?
‘अंत से आरंभ तक’ ही चित्रपटाची प्रभावी टॅगलाइन टीझरमधून अधिक अर्थपूर्ण ठरते. एखादी गोष्ट जिथे संपल्यासारखी वाटते, तिथूनच कदाचित मोठ्या तपासाची आणि दडलेल्या सत्याच्या शोधाची सुरुवात होत असते, असा संकेत या शीर्षकातून मिळतो. ‘सूर्या’मध्ये सनी देओल दोन वेगवेगळ्या जगांमध्ये अडकलेले दिसतात. एकीकडे त्यांचा भूतकाळ आहे, ज्यापासून त्यांना सुटका करून घेता येत नाही; तर दुसरीकडे वर्तमानातील परिस्थिती त्यांना ठोस पावले उचलण्यास भाग पाडते. या दोन्ही गोष्टींचा संघर्ष सुरू झाल्यानंतर सत्याच्या शोधात सूर्या अशा शक्तींशी भिडतो, ज्या कोणत्याही परिस्थितीत हे सत्य जगासमोर येऊ देऊ इच्छित नाहीत. टीझरमध्ये भावनिक प्रसंग, तपास, कटकारस्थाने आणि अॅक्शन यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळतो. मात्र, सूर्या अखेरीस नेमके कोणते सत्य उघड करतो, याबाबतचे गूढ निर्मात्यांनी अद्याप कायम ठेवले आहे.
चित्रपटात तगडी कलाकारांची फळी
‘सूर्या’मध्ये सनी देओल यांच्यासोबत रवि किशन, प्रज्ञा जायस्वाल, तनुश्री चक्रवर्ती, मनीष वाधवा, टीनू आनंद, विरति वाघानी, जिस्शु सेनगुप्ता, खालिद सिद्दीकी, अनूप त्रिवेदी आणि रोहित तिवारी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.एम. पद्मकुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कमल मुकुट यांच्या चित्रपटाची निर्मिती दीपक मुकुट, हेमंत मुकुट आणि लोकेश मुकुट यांनी MM Moviez या बॅनरअंतर्गत केली आहे. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी Zee Music Company कडे आहे. सनी देओल यांचा वेगळा अवतार, वैद्यकीय व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांचा तपास आणि रहस्य-थराराने भरलेली कथा यांमुळे ‘सूर्या : अंत से आरंभ तक’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
