Download App

Atul Pethe: पुण्यातील प्रायोगिक नाटकांविषयी ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे नेमकं काय म्हणाले…

Atul Pethe On Experimental Theater: अनेक वेगवेगळ्या प्रायोगिक रंगभूमी वरचे यशस्वी दिग्दर्शक. विषयातले नाविन्य, मांडणीतले वैविध्य अशी खासियत असणारे ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे (Atul Pethe ) यांची ओळख आहे

Atul Pethe On Experimental Theater: अनेक वेगवेगळ्या प्रायोगिक रंगभूमी वरचे यशस्वी दिग्दर्शक. विषयातले नाविन्य, मांडणीतले वैविध्य अशी खासियत असणारे ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे (Atul Pethe ) यांची ओळख आहे. (Pune Theater) नभोनाटक, माहितीपट, प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटकं, या सारख्या विविध क्षेत्रात आपली अनोखी ओळख निर्माण करणारे आगळे वेगळे दिग्दर्शक म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. आता पुण्यातील (Pune News) प्रायोगिक नाटकांविषयी त्यांनी थेटच वक्तव्य केले आहे.

पुण्यातील प्रायोगिक नाटकांविषयी ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे म्हणाले की नमस्कार.पुण्यात सध्या प्रायोगिक नाटकांचा जल्लोष सुरू आहे. खूप आनंद वाटत आहे. पुण्यात हे विशेषत्वाने घडताना का दिसत आहे ? इतर गावी असे घडू शकेल का ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मी इथे शोधू पाहात आहे. कदाचित त्याचा फायदा सर्वांना होईल.


तर पुण्यात प्रायोगिक नाटक गेले अनेक वर्ष सुरू आहे. पूर्वी कलोपासक, पीडीए, जागर, ड्रॉपर्स, थिएटर अकादमी अशा नाट्यसंस्था होत्या. त्या विविध जागी नाटके करत. त्यातही काही हॉलमध्ये प्रयोग होत असत. स.प.महाविद्यालय, पेरुगेट भावेस्कूल, फर्ग्युसन कॉलेज किंवा इतर हॉलमध्ये छोटेखानी प्रयोग होत. या संस्थेतील लोक गांभीर्याने प्रयोग करत. कधी ते विविध जागी जाऊन त्या त्या सोसायटीत प्रयोग करत. जोडीला पुरुषोत्तम करंडक, ड्रॉपर्स नाट्यवाचन असले महत्वाचे उपक्रम सुरू असत. त्यातून तरुण रंगकर्मींची नव्या दमाची फळी तयार होत असे. त्याला त्याचे त्याचे म्हणून एक ‘ग्लॅमर’ असे. त्यातून राज्य नाट्य स्पर्धा आणि मग त्यातून नवा नाट्यगट उभारी धरत असे.

मी थिएटर अकादमीच्या प्रांगणात असताना सतीश आळेकरांच्या ‘प्रलय’ नाटकात काम केले होते. ते आम्ही फर्ग्युसनच्या हॉलमध्ये करत असू. समीप नाट्याचा फार सुंदर अनुभव तयार होत असे. माधुरी पुरंदरे तर चक्क एखाद्या घरातील बेडरूममध्ये कॉटवर बसून ‘अब्द अब्द’ करत असत. आजुबाजुला फारतर 10/15 प्रेक्षक असतील. तर असे काही प्रयोग आम्हीही करू लागलो. पेरूगेट भावेस्कूलमध्ये आम्ही ‘शीतयुद्ध सदानंद’ , ‘सापत्नेकरचे मूल’, ‘ठोंब्या’ इत्यादी प्रयोग करत असू. पण तिथे प्रयोग करणे हे दरवेळी फार कष्टाचे असे. काळे पडदे आणि विंगा लावा, लाइट्सकरता बांबू लावा, मीटर मधून सप्लाय घ्या, प्रेक्षकांना बसायची व्यवस्था करा, पार्किंग अशा अनेक भानगडी करून प्रयोग करावे लागत. ही जागा आम्ही तात्पुरती वापरत असू.

पण पुढे संदेश कुलकर्णी, किरण यज्ञोपवीत, शशांक शेंडे या मंडळींनी ‘स्नेहसदन’ ही जागा चालवली. तीही तशी अडचणींची होती. पण तिथे प्रेक्षक येऊ लागला होता. मात्र काही वर्षानंतर डॉ. रवींद्र दामले आणि शुभांगी दामले यांनी ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर ‘ च्या अंतर्गत ‘सुदर्शन रंगमंच’ हे कायमस्वरुपी समीप नाट्यगृह उभे केले. तिथे नाटकासाठी किमान सोयी उपलब्ध करून दिल्या. मुख्य म्हणजे प्रायोगिक नाटकांना स्वागतशील अवकाश बनवला. तिथे तालमी, प्रदर्शने आणि कार्यशाळा होत असत. प्रमोद काळे आणि मंडळी फार हिरीरीने हे काम करत असत. सोबत Grips ची नाटके श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडेंनी आणली. मात्र ही जागा जरी सुरू झाली तरी तिथेही उंची, लांबी रुंदी, एसी, पार्किंग वगैरे अडचणी होत्याच.

पण या अडचणींवर मात करून ‘सुदर्शन’ ने पुण्याच्या प्रायोगिक विश्वात उत्साह आणला. मोहित टाकळकर आणि आशिष मेहता यांनी ‘आसक्त’ या त्यांच्या नाट्यसंस्थेतर्फे विविध नाटके केली. ‘रिंगण’ सारखे वाचन उपक्रम चालवले. यात अनेक नामवंत रंगकर्मींना त्यांनी ओढून आणले होते. त्यांच्या या नाट्यगटातच प्रदीप वैद्य होता. या सर्वांनी नवी ‘रंगदृष्टी’ आणली. पुढे महाराष्ट्र कल्चरल सेंटरने ‘जोत्स्ना भोळे रंगमंच’ उभा केला. तो अधिक मोठा आणि अधिक सोयींनी उपलब्ध होता. मात्र तिथेही रंगमंच उंची हा प्रश्न जाणवत असे. याच काळात थिएटर अकादमीने ‘सकल ललित कला घर ‘ सुरू केले. पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राचे ‘अंगणमंच’ साकारले. अशा एकाच्या जागी तीन – चार जागा प्रायोगिक नाटकांसाठी उभ्या राहिल्या.

या पार्श्वभूमीवर प्रदीप वैद्य यांनी 17 ऑगस्ट 2020 रोजी ‘द बॉक्स’ हे नाट्यगृह स्वतःच्या हिमतीवर रचले. कर्वेरस्त्यावर मोक्याच्या जागी ‘रेस्कॉन’ या कंपनीच्या आवारात मोठ्या शेडमध्ये अर्ध्या भागात ‘ब्लॅक बॉक्स’ साकारले. याला आवश्यक उंची आणि लांबी रुंदी होती. प्रदीप वैद्य हे पुण्यात प्रकाशयोजनाकार म्हणून ख्यातकीर्त आहेत. मोहित टाकळकरांसोबत त्यांनी आणि त्यांची पत्नी रुपाली भावे यांनी अनेक नाटके केली आहेत. 1999 साली या मंडळींनी कणकवलीच्या स्पर्धेत ‘ब्रेन सर्जन’ ही एकांकिका केली होती. प्रदीपचे लेखन आणि प्रकाश योजना होती. त्या एकांकिकेला पहिले पारितोषिक मिळाले होते. लक्षणीय दृश्यभाषा त्यात होती. प्रदीप वैद्य यांचे सोबत मीही जोडला गेलो. माझ्या अनेक नाटकांची प्रकाशयोजना त्यांनी केली.

कणकवलीपासून प्रदीप मला अतिशय कल्पक आणि नाट्य किडा म्हणून माहीत झाला. पण त्याने ‘द बॉक्स’ उभारून अचंबित केले. मला त्याने ती शेड दाखवायला नेले होते. तिथपासून ते आजच्या ‘बॉक्स’च्या स्वरूपाची सर्व स्थित्यंतरे मी अनुभवली आहेत. आता गेल्या चार दिवसांपासून तिथे अधिकची भर पडली आहे. उरलेल्या जागेतही त्याने अजून एक समीप नाट्यगृह सुरू केले आहे. तसेच तालीम हॉल, प्रदर्शन हॉल आणि कॅफेटेरिया सुरू केला आहे. हे सारे थक्क करणारे आहे.

यात महाराष्ट्र कल्चरल सेंटरने ‘श्रीराम लागू रंग-अवकाश’ हेही सर्व सोयींनी उपलब्ध असे उत्तम समीप नाट्यगृह सुरू झाले. पुण्यात आता इथे एकाच वेळी आठ दहा प्रयोग रोज होऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे ही थिएटर्स आपले शुभांगीताई, प्रमोद काळे, राजेश देशमुख, किरण यज्ञोपवित, हर्षवर्धन राजपाठक, प्रदीप आणि रुपाली असे नाट्यप्रेमी चालवतात म्हणून त्यात ममत्व आणि स्वागतशीलपणा आहे. याचा परिणाम असा की या सर्व ठिकाणी महाराष्ट्रातील गावोगावचे लोक नाटक करत असतात. त्यात अतुलकुमार, ज्योती डोग्रा, मोहित टाकळकर, आलोक राजवाडे, निपुण धर्माधिकारी, प्रवीण भोळे यांचे संगतीने पुण्यातील नव्या दमाची निरंजन पेडणेकर, अनुपम बर्वे, अजित साबळे, सूरज पारसनीस आदी मंडळी प्रयोग करत असतात. प्रत्येक गट क्लुप्त्या लढवून ‘हाऊसफुल्ल’ होईल असा प्रेक्षक खेचून आणत असतो. त्यामुळे तुलनेने प्रेक्षक वाढला आहे. मीही या नव्या मंडळीत सामील होऊन ही नवी मजा अनुभवत असतो.सतत न थकता कष्ट घेऊन आनंदाने नाटक करणारी माणसे इथे पुण्यात काम करत आहेत. नव्या जागा हुडकून तिथे ते प्रयोग करत राहिले. असे नाट्यअवकाश त्यांनी उभी केले आणि आणि असे नाट्यअवकाश आता नवे रंगकर्मी तयार करत आहेत. ही परस्परपूरक घटना पुण्यात केवळ आणि केवळ स्वइच्छेवर आणि स्वबळावर उभी राहिली आहे.

Marathi Theater Council नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्रात आज काही ठिकाणी नाट्यगट काम करत आहेत. मुंबईत आणि कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक अशा गावांत अनेक वर्ष ही परंपरा घट्टपणे अनेकांनी चालवली. मात्र काही ठिकाणी आज काहीशी ओहोटी लागली आहे. पण ओहोटी असली तरी भरती येतेच. तर आजच्या नव्या रंगकर्मींनी परत उभारी धरून आपापल्या जागी हे ‘रंग रान’ जोपासावे आणि ‘रंग स्थान’ करावे म्हणून हा खटाटोप !खूप प्रेम आणि सदिच्छा !अतुल पेठे 23 जून 2024 सोबत सर्व छायाचित्रे ‘ द बॉक्स हब’ मधली आहेत.

follow us