राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आज (ता. २४) प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहोचल्या. यावेळी त्यांनी आई प्रज्ञाताई मुंडे यांच्यासह त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.
प्रयागराज येथील घाटावर जाऊन त्यांनी संगमात आस्थेची पवित्र डुबकी घेतली. प्रयागराजमधील कुंभमेळ्यात पंकजा व त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे यांच्यासह त्रिवेणीच्या संगमात पवित्र स्नान केले. तसेच त्यांनी यावेळी त्रिवेणी संगम येथे आरती आणि प्रार्थना देखील केली.
यावेळी माध्यमांशी बोलतांना पंकजा म्हणाल्या, महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानाचा आणि इथल्या वातावरणाचा अद्भुत आणि अद्वितीय असा अनुभव मला आला. २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याची तयारी कशी करता येईल याचा अभ्यास आम्ही इथे केला.
एवढी प्रचंड गर्दी असूनही प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याची व्यवस्था अतिशय चोख आणि नियोजनबद्ध आहे त्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या टीमचे त्यांनी मनापासून कौतूक केले.
खरचं, मन भारावून गेले.. हा महाकुंभ यशस्वी करण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत सर्व जण खूप परिश्रम घेत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंकजा मुंडे यांनी उत्तरप्रदेशमधील पर्यावरण आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत देखील या दौऱ्यात चर्चा करून इथल्या पर्यावरण विषयक बाबींचा अभ्यास केला.
नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्यात याचा कसा उपयोग करून घेता येईल याचीही माहिती त्यांनी घेतली.