हैतीची राजधानी पोर्ट-ओ-प्रिंसजवळील (Shooting) केन्सकॉफ परिसरात शस्त्रधारी टोळीने भीषण हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी आणि सोमवारी तब्बल 24 तास परिसरात गोळीबार सुरू होता. या हिंसाचारात आतापर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेची संयुक्त राष्ट्रांनीही गंभीर दखल घेतली असून, दोन दिवस झालेल्या हिंसाचाराला दुजोरा दिला आहे
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, शस्त्रधारी टोळीने चर्चमध्ये आश्रय घेतलेल्या तसेच हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना लक्ष्य केलं. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली. हल्ल्यानंतरही काही सशस्त्र हल्लेखोर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळत असून, अपहरण करण्यात आलेल्या नागरिकांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.
Donald Trump : ट्रम्प यांचे वजन 10 किलोंनी वाढले; जगातील सर्वात ‘वजनदार’ 5 नेते कोण?
केन्सकॉफ हे पोर्ट-ओ-प्रिंसपासून दक्षिणेला सुमारे 15 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात वसलेलं आहे. या भागात रविवारी रात्रीपासून हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. हिंसाचाराचा मोठा फटका स्थानिक नागरिकांना बसला असून, राजधानीच्या काही भागांवरही शस्त्रधारी टोळीचा प्रभाव असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, 50 हून अधिक नागरिकांचे सामूहिक अपहरण झाल्यानं या घटनेकडं अत्यंत गंभीर स्वरूपाचं संकट म्हणून पाहिलं जात आहे. हैतीमधील वाढत्या टोळी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यामुळं परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिसरातील हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
