Download App

लाओस, कंबोडियाला जाताय? मग सावध व्हा! अ‍ॅडव्हाजरी जारी, कारण काय?

विदेशात जाऊन नोकरी करण्याचं अनेक भारतीयांचं स्वप्न असतं. यासाठी मोठी मेहनतही घेतात. परंतु, फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात. अशी अनेक प्रकरण उजेडात आली आहेत.

Indian Nationals Travelling to Laos Cambodia : विदेशात जाऊन नोकरी करण्याचं अनेक भारतीयांचं स्वप्न असतं. यासाठी मोठी मेहनतही घेतात. परंतु, फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात. अशी अनेक प्रकरण उजेडात आली आहेत. या प्रकारांची भारत सरकारने गंभीर दखल घेतली आहे. भारतीय नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने रोजगाराच्या उद्देशाने कंबोडियाला जाणाऱ्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. लाओस आणि कंबोडियाला जाणाऱ्या भारतियांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.

दूतावासाने म्हटले आहे, की भारतीय नागरिकांनी फक्त विदेश मंत्रालयाद्वारे मान्यता दिलेल्या अधिकृत मधस्थांमार्फतच विदेशात गेले पाहिजे. कंबोडिया किंवा अन्य दक्षिण आशियाई देशात कुणी नोकरीसाठी जात असेल तर त्यांनी खोट्या एजंट्सपासून सावध राहावे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत एजंट्समार्फतच विदेशात जावे. नोकरी शोधणाऱ्यांनी भारतीय दूतावासाच्या ई मेल आयडीवर संपर्क साधला तरी चालेल.

नेपाळमध्येही मसाल्यांवर संकट! MDH-एव्हरेस्ट मसाले विक्री अन् वापर बंद

भारतीय नागरिकांना थायलंड मार्गे लाओसमध्ये रोजगाराचे अमिष दाखवले जात आहे. या खोट्या नोकऱ्या लाओसमधील गोल्डन ट्रँगल स्पेशल इकॉनॉनिक झोनमध्ये कॉल सेंटर घोटाळा आणि क्रिप्टो करन्सी फसवणुकीत सहभागी असणाऱ्या कंपन्यांकडून विविध पदांसाठी असतात, असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अॅडव्हायजरीत स्पष्ट केले आहे.

या भागात नकली एजंट्सचा सुळसुळाट झाला आहे. हे एजंट भारतातील एजंटांबरोबर काम करत आहेत आणि लोकांना खोट्या कंपन्यांत नोकरीचे अमिष दाखवत आहेत. ज्याला कुणाला कंबोडियात नोकरीसाठी जाण्याची इच्छा असेल त्याने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिलेल्या अधिकृत एजंटशीच संपर्क साधावा असे आवाहन सरकारने केले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चीन दौऱ्यावर; ‘नो लिमिट्स’ बाबत मोठ्या घोषणांची शक्यता

अलीकडच्या काळात अशी काही प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये भारतीय नागरिकांना थायलंडच्या माध्यमातून लाओसमध्ये रोजगाराचे अमिष दाखवले जाते. अवैध पद्धतीने थायलंडवरून लाओसमध्ये नेले जाते. नंतर येथील गोल्डन ट्रँगल विशेष आर्थिक क्षेत्रात काम करण्यासाठी बंदी बनवले जाते. या ठिकाणी जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले जाते.

थायलंड आणि लाओस व्हिसा ऑन अरायव्हल रोजगाराची परवानगी देत नाही. अशा प्रकारच्या व्हिसावर लाओसमध्ये येणाऱ्या नागरिकांना लाओसचे अधिकारी वर्क परमिट देत नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयाने या अॅडव्हायजरीत म्हटले आहे. यानंतर भारतीय नागरिकांनी या दोन्ही देशांत नोकरीच्या उद्देशाने जाताना आधी सर्व सावधानता बाळगाावी असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

follow us