नेपाळमध्येही मसाल्यांवर संकट! MDH-एव्हरेस्ट मसाले विक्री अन् वापर बंद
नेपाळने एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन भारतीय ब्रँडच्या मसाल्यांच्या आयात, वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे.

Nepal News : नेपाळने एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन भारतीय ब्रँडच्या मसाल्यांच्या आयात, वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. नेपाळ सरकारच्या खाद्य प्रौद्योगिकी आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने या मसाल्यांत कीटकनाशके, इथिलीन ऑक्साइड असण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आला. यानंतर आता नेपाळ सरकारने या मसाल्यांत इथिलीन ऑक्साइडची तपासणी सुरू केली आहे.
इथिलीन ऑक्साइडमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. नेपाळच्या प्रौद्योगिकी आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी सांगितले की एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर एक आठवड्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या दोन ब्रँडच्या मसाल्यात इथिलीन ऑक्साइडची तपासणी केली जात आहे. या तपासणीचा अंतिम अहवाल मिळेपर्यंत बंदी कायम राहणार आहे.
आता मालदीवमध्येही MDH-एव्हरेस्ट मसाल्यांवर बंदी, कॅन्सर सबस्टन्स इथिलीन ऑक्साईड आढळले
याआधी हाँगकाँगच्या खाद्य नियामक सेंटर फॉर फूड सेफ्टीने सांगितले होते की या मसाल्यांमध्ये कीटकनाशक, इथिलीन ऑक्साइड आहे. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. एमडीएच आणि एव्हरेस्टच्या चार मसाला उत्पादनांवर बंदी घातली होती. सिंगापूरच्या खाद्य एजन्सीने या ब्रँडच्या मसाल्यांना वापस घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ब्रिटेनच्या खाद्य मानक एजन्सीने (एफएसए) गुरुवारी स्पष्ट केले की यावर्षीच्या सुरुवातीला भारतीय ब्रँडच्या मसाल्यात इथिलीन ऑक्साइडच्या अतिरिक्त नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. एफएसएने स्पष्ट केले होते की इथिलीन ऑक्साइडच्या अधिकच्या पातळीसाठी प्रारंभिक इशारा आहे. ब्रिटेनमध्ये इथिलीन ऑक्साइडवर बंदी आहे.
इथिलीन ऑक्साईड किती धोकादायक आहे?
इथिलीन ऑक्साईड हे एक धोकादायक रसायन आहे. या रसायनामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. यामुळे डीएनए, मेंदू आणि मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते. अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मते, इथिलीन ऑक्साईडमध्ये डीएनए खराब करण्याची क्षमता आहे. या इथिलीन ऑक्साईड खाण्यात आल्यास लिम्फोमा आणि ल्युकेमिया होऊ शकतो. याशिवाय पोट आणि स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.