नेपाळमध्ये पुराच्या पाण्यात वाहून आलेली बँकेची तिजोरी लुटली, आतापर्यंत 29 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नेपाळ पोलिसांनी आतापर्यंत 29 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल 92 लाखांहून अधिक नेपाळी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Untitled Design   2026 08 29T180051.888

Untitled Design 2026 08 29T180051.888

Bank vault looted in Nepal : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले असतानाच, पुराच्या पाण्यात वाहून आलेली बँकेची तिजोरी फोडून त्यातील लाखो रुपयांची रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात नेपाळ पोलिसांनी आतापर्यंत 29 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल 92 लाखांहून अधिक नेपाळी रुपये जप्त करण्यात आले आहेत. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 58 लाख रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील रासुवा जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला. पुराच्या प्रचंड प्रवाहात बँकेची एक तिजोरी वाहून गेली होती. ही तिजोरी त्रिशूली नदीच्या प्रवाहातून अनेक किलोमीटर अंतर वाहत धादिंग जिल्ह्यातील बेलखुखोला परिसरात पोहोचली. पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही तिजोरी आली.

मात्र, याची माहिती पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणांना देण्याऐवजी काही लोकांनी तोजोरी फोडल्याचा आरोप आहे. तिजोरी उघडल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड असल्याचे दिसून आले. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी ही रोकड आपापसात घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत तिजोरीतील मोठी रक्कम गायब झाली होती.

शरद पवारांनी भाकरी फरवली! पक्षात केला मोठा फेरबदल; 10 नव्या प्रवक्त्यांची घोषणा

या घटनेची माहिती मिळताच नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाने संयुक्तपणे तपास सुरू केला. परिसरातील नागरिकांकडून माहिती घेण्यात आली तसेच संशयितांचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी एकामागोमाग 29 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या वसुलीत 92 लाखांहून अधिक नेपाळी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व 29 संशयितांना सध्या धादिंग येथील जिल्हा पोलीस कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू असून, संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया राबवली जात आहे. तिजोरी फोडण्यात नेमके कोण सहभागी होते, रोकड कोणी आणि किती प्रमाणात घेतली तसेच या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, पुरात वाहून आलेल्या या तिजोरीमध्ये मूळ किती रक्कम होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांसमोर आता तिजोरीच्या मालकीचा देखील प्रश्न आहे. ही तिजोरी नेमक्या कोणत्या बँकेची किंवा संस्थेची होती, त्यामधील रोकड कोणाच्या मालकीची होती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम तिजोरीत कशासाठी ठेवण्यात आली होती, याचा तपास सुरू आहे.

FDAला मुंबई हायकोर्टाचा दणका; सिप्लाचा औषध विक्री परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे

विशेष म्हणजे, पोलिसांनी 92 लाखांपेक्षा अधिक नेपाळी रुपये हस्तगत केले असले तरी तिजोरीतील संपूर्ण रक्कम परत मिळाली आहे का, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. सुरक्षा यंत्रणांनी काही रोकड अद्याप गायब असण्याची शक्यता नाकारलेली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी आणखी काही व्यक्तींनी पैसे घेतले असण्याची शक्यता देखील तपासली जात आहे.

पुरामुळे अनेक भागांत दळणवळण विस्कळीत झाले असून घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पुराच्या पाण्यातून वाहून आलेल्या वस्तू किंवा मालमत्तेची चोरी आणि लूट होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी वाढवली आहे. पूरग्रस्त भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली असून सार्वजनिक, व्यावसायिक तसेच खासगी मालमत्तेच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

एकीकडे पुराच्या संकटामुळे नागरिकांचे संसार उध्वस्त झालेले असताना, दुसरीकडे पुरात वाहून आलेली बँकेची तिजोरी फोडून त्यातील लाखो रुपयांची रोकड घेऊन जाण्याचा प्रकार समोर आल्याने या घटनेची नेपाळमध्ये चर्चा सुरू झाली आहे. आता तिजोरीत मूळ किती पैसे होते, जप्त करण्यात आलेल्या ९२ लाखांव्यतिरिक्त आणखी किती रक्कम गायब आहे आणि या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, हे पुढील पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version