Discussion between Prime Minister Modi and Iranian President : पश्चिम आशियात सध्या तणावाची भीषण स्थिती निर्माण झाली असून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात तुफान संघर्ष पेटला आहे. तिन्ही देशांकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिघळताना दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेकडून काही निर्बंध शिथिल करण्याचे संकेत देत युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी इराणकडून हल्ल्यांची तीव्रता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे इराण सध्या माघार घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
या पार्श्वभूमीवर मसूद पेझेश्कियान यांनी शनिवारी (21 मार्च 2026) नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून महत्त्वपूर्ण चर्चा केली. या संवादात द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक तणाव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसह अमेरिका-इस्रायलच्या लष्करी कारवाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला. इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी या युद्धाला “बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे” ठरवत, हा संघर्ष इराणने सुरू केलेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, अणुचर्चा सुरू असतानाच कोणताही ठोस किंवा कायदेशीर आधार नसताना अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले चढवले.
या हल्ल्यांमध्ये इराणमधील महत्त्वाचे लष्करी अधिकारी, इस्लामिक क्रांतीशी संबंधित वरिष्ठ नेते तसेच निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. विशेषतः एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात 168 निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप इराणने केला आहे. याशिवाय देशातील पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. पेझेश्कियान यांनी पुढे सांगितले की, इराण आपल्या शांततापूर्ण अणुकार्यक्रमाबाबत पारदर्शकता ठेवण्यास तयार आहे. यासाठी जागतिक नेत्यांशी संवाद साधण्याची आणि प्रादेशिक स्तरावर सुरक्षा चौकट उभारण्याची तयारी इराणने दर्शवली आहे.
माती गटातल्या उपांत्य सामन्यात अहिल्यानगरच्या सुदर्शनचा पराभव, सिकंदर शेख अंतिम फेरीत दाखल
युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी अमेरिका आणि इस्रायलने तात्काळ आक्रमकता थांबवावी, तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची हमी द्यावी, अशी ठाम भूमिका मांडली. तसेच, भारताच्या ब्रिक्समधील भूमिकेचा उल्लेख करत या संघर्षात शांततेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा त्यांनी निषेध करत, यामुळे जागतिक अन्न आणि ऊर्जा सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट केले.
याशिवाय, होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्याचे आणि पर्शियन आखातातील नौकानयनाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. एकूणच, या वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत परिस्थिती कोणत्या दिशेने वळते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
